
सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील ओरोस परिसरातील पीठढवळ नदीमध्ये नारळी पौर्णिमेच्या दिवशी वाहून गेलेल्या विजय जंगले या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. सावंतवाडी तालुक्यातील केसरी येथील 'के.एस.आर ग्लोबल एक्वेरियम' मधील दोन तरुण स्कुबा डायव्हर्सनी आपल्या जीवाची बाजी लावून हा मृतदेह शोधून काढला.
नारळी पौर्णिमेच्या दिवशी पूजेचा नारळ वेचण्यासाठी विजय जंगले हे नदीकाठी गेले असता अचानक पाय घसरून ते पीठढवळ नदीच्या खोल पात्रात पडले. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पातळीवर शोधकार्य सुरू करण्यात आले होते. मात्र, पुराची स्थिती आणि पाण्याचा प्रचंड वेग यामुळे अडथळे येत होते.
या कठीण प्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या केसरी येथील के.एस.आर. चे स्कुबा डायव्हर्स सूरज खवणेकर आणि सुमित पराडकर हे दोघे तरुण मदतीसाठी धावून आले. या मोहिमेत मालवणचे 'जय बालाजी'रेस्क्यू' पथक आणि एन.डी.आर.एफ.च्या टीमचेही मोलाचे सहकार्य लाभले.
सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांनंतर आणि के.एस.आर. एक्वेरियममध्ये स्कुबा डायव्हिंगचे प्रशिक्षण देणाऱ्या या दोन्ही युवकांनी खोल व गढूळ पाण्यात उतरून अत्यंत जोखमीचे शोधकार्य हाती घेतले. या दोन युवकांच्या धाडसी कामगिरीमुळे विजय जंगले यांचा मृतदेह नदीच्या तळाशी शोधून बाहेर काढण्यात यश आले.
आपल्या जीवाची पर्वा न करता नदीच्या खोल पाण्यात उतरून मृतदेह शोधणाऱ्या सूरज खवणेकर आणि सुमित पराडकर यांच्यासह मदतकार्यात सहभागी झालेल्या संपूर्ण टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.











