LIVE UPDATES

कमी जागेत अधिक उत्पादनाचा ‘खेकडा फॉर्म्युला’

पडेलमध्ये आधुनिक संवर्धनाचे प्रशिक्षण : युवकांसाठी रोजगाराची नवी संधी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 31, 2026 15:26 PM
views 25  views

देवगड : कमी जागेत शास्त्रीय पद्धतीने अधिक उत्पादन घेऊन खेकडा संवर्धनातून चांगले उत्पन्न मिळविण्याची संधी आता स्थानिक युवकांसाठी उपलब्ध होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रीय व्यवस्थापन आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून बंदिस्त खेकडा संवर्धनाचे विशेष प्रशिक्षण पडेल येथे १ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत मत्स्य संशोधन केंद्र, मुळये आणि ग्रामपंचायत पडेल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पडेलचे सरपंच भूषण पोकळे आणि पंचायत समिती सदस्य अंकुश ठुकरूल यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.

खेकडा संवर्धन व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत स्थानिक युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराची नवी दिशा मिळावी, हा या प्रशिक्षणामागील प्रमुख उद्देश आहे. विद्यापीठाचे कल्पेश शिंदे प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करणार आहेत.

प्रशिक्षणामध्ये खेकड्यांची योग्य निवड व हाताळणी, बंदिस्त संवर्धनासाठी आवश्यक सुविधा, पाण्याची गुणवत्ता व व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन, स्वतंत्र कप्पा पद्धतीने संवर्धन, आरोग्य व रोग व्यवस्थापन, खेकड्यांची वाढ व उत्पादन तसेच बाजारपेठ, विक्री आणि आर्थिक नियोजन याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे आधुनिक खेकडा संवर्धन तंत्रज्ञान समजावून सांगण्यात येणार असल्याने मत्स्य व्यावसायिक, शेतकरी आणि या व्यवसायात उतरू इच्छिणाऱ्या युवकांसाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कमी जागेत योग्य तंत्रज्ञान आणि शास्त्रीय व्यवस्थापनाचा वापर करून अधिक उत्पन्न मिळविण्याच्या दृष्टीने पडेलमधील हा उपक्रम खेकडा संवर्धनाला नवी दिशा देणारा ठरण्याची अपेक्षा आहे.