LIVE UPDATES

महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा युवा पुरस्काराने कोकण संस्थेचा सन्मान

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 17, 2026 16:23 PM
views 27  views

सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, भारत सरकार अंतर्गत महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने सामाजिक संस्थांना प्रदान करण्यात येणारा जिल्हा युवा पुरस्कार सन २०२४-२५  कोकण संस्थेला १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग डॉ. मोहन दहिकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग रवींद्र खेबुडकर आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेच्यावतीने संस्थापक दयानंद कुबल आणि संस्था सदस्य योगेश भोसले सह कोकण संस्था कार्यकर्ते प्रथमेश सावंत, तन्वी केसरकर, ऋचा पेडणेकर, वैधवी म्हाडगुत, गौरी आडेलकर, समिर शिर्के, स्वाती मांजरेकर, शशिकांत कासले, चेतन धरणे, वैष्णवी म्हाडगूत, निलेश खामकर आदी उपस्थित होते.

गेल्या १५ वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, स्वच्छता मोहीम,क्रीडा स्पर्धा, रक्तदान शिबिर, पर्यावरण, युवक विकास तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांद्वारे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कोकण संस्थेच्या कार्याची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार  मिळाल्याबद्दल संस्थेवर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आहे. जिल्ह्यातील सामाजिक संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा तसेच युवकांमध्ये नेतृत्व, सामाजिक बांधिलकी आणि विकासात्मक कार्याला चालना मिळावी, या उद्देशाने युवा कल्याण व क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्फत दरवर्षी जिल्हास्तरीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. कोकण संस्थेच्या या यशामुळे जिल्ह्याच्या सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.