LIVE UPDATES

कोकण रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! दिवा-पनवेल मार्गावर पॉवर ब्लॉक; अनेक एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

Konkan Railway Train Update : कोकण मार्गावर धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. प्रवाशांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 23, 2026 03:44 PM
views 50  views
Konkan Railway express train affected by Central Railway power block on Diva-Panvel route.

रत्नागिरी : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर २२ ते २९ नोव्हेंबरदरम्यान पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे कोकण मार्गावर धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. या कालावधीत सहा गाड्या मार्गात नियंत्रित करण्यात येणार असून, दोन गाड्या निर्धारित वेळेपेक्षा दोन तास उशिराने सुटतील. 

मंगळुरू-मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस ही २२ ते २८ नोव्हेंबरदरम्यान आपटा स्थानकात ५० मिनिटे, तर मडगाव-मुंबई सीएसएमटी कोकणकन्या एक्सप्रेस ही याच कालावधीत सोमटणे स्थानकात १० मिनिटे नियंत्रित केली जाणार आहे. तिरुअनंतपुरम-लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस ही २३ नोव्हेंबरला, एर्नाकुलम-पुणे एक्सप्रेस ही २४ आणि २७ नोव्हेंबरला, तर तिरुअनंतपुरम-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ही २८ नोव्हेंबरला आपटा येथे १०९ मिनिटे नियंत्रित राहणार आहे.

एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ही २५ नोव्हेंबरला ६० मिनिटे नियंत्रित केली जाणार आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एक्सप्रेस ही २४, २७, २८ आणि २९ नोव्हेंबरला, तर लोकमान्य टिळक टर्मिनस-करमळी सुपरफास्ट एक्सप्रेस ही २६ नोव्हेंबरला दोन तास उशिराने सुटणार आहे. प्रवाशांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.