
सिंधुदुर्ग : आडाळी औद्योगिक क्षेत्रातील भूखंडधारक उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी आवश्यक असलेल्या विविध प्रशासकीय प्रक्रिया, ऑनलाइन व ऑफलाइन कार्यपद्धतींची माहिती एकाच ठिकाणी मिळावी, यासाठी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या समवेत आडाळी सरपंच पराग गावकर, प्रशांत जाधव व बाबा धुरी यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन यासंदर्भातील निवेदन सादर केले.
उद्योगमंत्र्यांच्या कार्यतत्परतेमुळे आडाळी औद्योगिक क्षेत्रातील अनेक प्रश्न मार्गी लागत असून, गेल्या वर्षभरापासून रखडलेले भूखंड वाटप व अन्य प्रक्रिया अलीकडच्या काळात मार्गी लागल्या आहेत. त्यामुळे ६० हून अधिक उद्योजकांनी उद्योग उभारणीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे.
मात्र, आडाळी औद्योगिक क्षेत्रातील बहुतांश भूखंडधारक हे गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजक असून, उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या महामंडळाच्या ऑनलाइन व ऑफलाइन प्रक्रियेबाबत त्यांना पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याने वेळ खर्च होत आहे. परिणामी प्रत्यक्ष उद्योग उभारणीला विलंब होत आहे.
उद्योजकांना एकाच ठिकाणी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सर्व आवश्यक माहिती, मार्गदर्शन व प्रशासकीय प्रक्रियेची पूर्तता करण्याबाबत माहिती मिळाल्यास उद्योग उभारणीला गती मिळेल तसेच महामंडळाच्या प्रशासकीय कामकाजाबाबत सकारात्मकता निर्माण होण्यास मदत होईल.
त्यामुळे आडाळी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचना प्रशासनाला द्याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी ग्रुप ग्रामपंचायत आडाळी व आडाळी औद्योगिक क्षेत्र विकास समिती सहकार्य करण्यास तयार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








