
रायगड : कोकण रेल्वे मार्गावर गोवे गावाच्या हद्दीत रेल्वेतून पडून एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. गोव्याच्या दिशेकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेच्या अपलाईन मार्गावर एक व्यक्ती पडल्याची माहिती मिळताच कोलाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोकण रेल्वे मार्गावरील गोवे गावाच्या परिसरात ही घटना घडली. रेल्वे मार्गावर एक व्यक्ती पडल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. मृत व्यक्तीचे अंदाजे वय ३० ते ३५ वर्षे असून, वर्ण सावळा आहे. अंगात काळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पँट असे त्याचे वर्णन आहे.
या घटनेची नोंद कोलाड पोलीस ठाण्यात मृत्यू रजिस्टर क्रमांक १३/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अंतर्गत करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, प्राथमिक नोंदीनुसार रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मात्र, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसल्याने तिची ओळख निश्चित करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमागील नेमके कारण काय, याचाही तपास केला जात आहे. कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्ने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक के. एस. नागे पुढील तपास करीत आहेत.












