
- कोकणसाद LIVEचे सब एडिटर भगवान शेलटे यांना आदर्श समाजसेवक कै. चंदू वाडीकर स्मृती पुरस्कार
- मंगल नाईक-जोशी, अभय पंडीत, संतोष परब, हेमंत काळसेकर यांचीही पुरस्कारांसाठी निवड
सावंतवाडी : सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार आज पुरस्कार निवड समितीने जाहीर केले. यामध्ये वैनतेयकार मे.द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक सकाळचे पत्रकार रूपेश हिराप यांना जाहीर करण्यात आला. याशिवाय माजी आमदार व जेष्ठ पत्रकार कै. जयानंद मठकर स्मृती पुरस्कार दैनिक तरूण भारतच्या उपसंपादक मंगल नाईक-जोशी, कै. पांडुरंग स्वार स्मृती 'जीवनगौरव पुरस्कार' ज्येष्ठ पत्रकार अभय पंडीत तसेच नाट्यकर्मी कै. बाप्पा धारणकर स्मृती पुरस्कार दैनिक सनातनचे पत्रकार संतोष परब व आदर्श समाजसेवक कै. चंदू वाडीकर स्मृती पुरस्कार कोकणसादचे उपसंपादक भगवान शेलटे यांना जाहीर करण्यात आला. तर, ज्येष्ठ छायाचित्रकार कै. मुरलीधर तथा बंडोपंत भिसे स्मरणार्थ छायाचित्रकार पुरस्कार हेमंत काळसेकर यांना जाहीर करण्यात आल्याची घोषणा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर यांनी केली.
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कार निवड समितीची निवड करण्यात आली होती. या निवड समितीमध्ये मुख्यमंत्र्यांचे माजी जनसंपर्क अधिकारी सतीश पाटणकर, पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.बी. भारमल, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी अध्यक्ष दीपक पटेकर, ज्येष्ठ विधीज्ञ शामराव सावंत, ज्येष्ठ पत्रकार शिवप्रसाद देसाई तसेच गतवेळचे आदर्श पत्रकार विजेते नागेश पाटील व निवड समितीचे पदसिद्ध पदाधिकारी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, सचिव विजय राऊत, खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांचा समावेश करण्यात आला होता. या सर्व पत्रकार पुरस्कार निवड समितीची आज पत्रकार कक्षात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्व निवड समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. सुरुवातीला प्रास्ताविक सचिव विजय राऊत यांनी केले. त्यानंतर पुरस्कारांच्या नावाबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर पुरस्कार प्राप्त आदर्श पत्रकारांची नावे घोषित करण्यात आली. आभार सहसचिव विनायक गांवस यांनी मानले.











