मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायतीचा नवा उपक्रम

‘धन्वंतरी’ मोफत आरोग्य तपासणी केंद्राचा शुभारंभ
Edited by: विनायक गांवस
Published on: January 05, 2026 15:46 PM
views 32  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून नवनवीन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात असताना आता यातच आणखीन एक भर पडली आहे ती म्हणजे ग्रामपंचायत कडून गावातील रुग्णाकरिता धन्वंतरी मोफत आरोग्य तपासणी केंद्र सुरू करण्यात येत असून याचा शुभारंभ मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी डॉ.सागर विवेक रेडकर (हृदयरोगतज्ञ, रेडकर हॉस्पिटल धारगळ पेडणे गोवा) यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.

यावेळी प्रमुख उपस्थिती सरपंच ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे सौ.मिलन विनायक पार्सेकर,उपसरपंच हेमंत रमाकांत मराठे,ग्रामविकास अधिकारी भालचंद्र सावंत,सर्व सदस्य,शासकीय निमशासकीय कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत होणार आहे. आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी सकाळी 10 ते दुपारी 1 वा. या वेळेत रुग्णांची मोफत तपासणी उपस्थित डॉक्टरकडून करण्यात येणार आहे.यासाठी रेडकर रिसर्च सेंटर चे डॉ.सागर रेडकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून याही पुढे आणखीन काही तज्ञ डॉक्टर मळेवाड गावामध्ये आणून रुग्णांची सेवा करण्याचा आपला मानस असल्याचे ग्रामपंचायतीचे ससरपंच सौ मिलन पार्सेकर,उपसरपंच हेमंत मराठे, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन मुळीक, मधुकर जाधव,कृषी सेवक अमित नाईक या शिष्टमंडळाला डॉ.रेडकर यांनी सांगितले.ग्रामपंचायत कडून धन्वंतरी मोफत आरोग्य तपासणी केंद्र सुरू करून एक नवा आदर्श ग्रामपंचायतने घातला असून गावातील गोरगरीब रुग्णांकरिता हे केंद्र खरोखरच लाभदायी ठरणार असून ग्रामपंचायतचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.