भोसले नॉलेज सिटी येथे 'स्पोर्ट्स फिएस्टा २०२६' चे दिमाखात उद्घाटन

विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा भावना, शिस्त व नेतृत्वगुण विकासावर भर
Edited by: विनायक गांवस
Published on: January 05, 2026 15:24 PM
views 27  views

सावंतवाडी: भोसले नॉलेज सिटी येथे यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी या दोन्ही महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पोर्ट्स फिएस्टा २०२५-२६ या वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले. या क्रीडा स्पर्धा दि.५ ते १० जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत.

संस्थेचे सचिव संजीव देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व क्रीडामशाल प्रज्वलीत करून स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ले.कर्नल रत्नेश सिन्हा (नि.), यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ.रमण बाणे, यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.विजय जगताप, डी.फार्मसी प्राचार्य सत्यजित साठे, स्पोर्ट्स को-ऑर्डिनेटर डॉ.प्रशांत माळी व प्रा.स्वागत केरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, खो-खो, थाळी फेक, गोळा फेक, रस्सीखेच, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम व बुद्धिबळ अशा विविध क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. यावेळी बोलताना डॉ.रमण बाणे म्हणाले, “खेळातून केवळ शारीरिक तंदुरुस्तीच नव्हे तर संघभावना, शिस्त आणि नेतृत्वगुण विकसित होतात.” मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नेश सिन्हा यांनी, “क्रीडा स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, जिद्द व राष्ट्रघडणीसाठी आवश्यक सकारात्मक वृत्ती निर्माण करतात,” असे मत व्यक्त केले.

यावेळी डॉ. विजय जगताप यांनी विद्यार्थ्यांना खेळभावनेची शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सागर खानोलकर तर आभार प्रदर्शन डॉ.प्रशांत माळी यांनी केले. उद्घाटनाचा हा संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.