
देवगड : येथील स्थानिक कलाकारांना संधी देणारा “कुर्ला टू वेंगुर्ला” हा नवीन मराठी चित्रपट येत्या १९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.विशेष म्हणजे, या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण आपल्या वेंगुर्ल्यात झाले असून, हा सिनेमा प्रत्येक घरातील कथा सांगणारा असल्याने प्रेक्षकांच्या मनात घर करेल अशी अपेक्षा आहे.या चित्रपटाचे कला दिग्दर्शक असलेले देवगडचे सुपुत्र,मंदार पेडणेकर यांनी ही माहिती दिली. कुठल्याही मोठ्या मीडिया बॅनर किंवा प्रोडक्शन हाऊसचा पाठिंबा नसतानाही अनेक आर्थिक अडचणींवर मात करत हा सिनेमा आता प्रदर्शनापर्यंत पोहोचला आहे, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. हा चित्रपट केवळ एक सिनेमा नसून, तो एका स्वप्नाची आणि जिद्दीची कहाणी आहे. स्थानिक पातळीवरील कलागुणांना वाव देत, अनेक प्रतिकूल परिस्थितीवर मात करत या चित्रपटाने आपले स्थान निर्माण केले आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले असून, ते प्रेक्षकांच्या उत्सुकतेत भर घालत आहे.
चित्रपटात “गाव गाता गजाली” व “रात्रीस खेळ चाले” या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचलेले अभिनेते प्रल्हाद कुडतरकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबतच अष्टपैलू अभिनेते वैभव मांगले आणि गुणी अभिनेत्री वीणा जामकर हे देखील महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. या कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहणे प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. याशिवाय, अनुभवी कलाकार सुनील तावडे, नवोदित स्वानंदी टिकेकर आणि साईंकित कामत हे देखील चित्रपटात विविध भूमिकांमध्ये दिसणार आहेत. या सर्व कलाकारांमुळे चित्रपटातील पात्रांना एक वेगळाच आयाम प्राप्त होईल अशी खात्री आहे.
सिने कथा कीर्तन, चंद्रभागा स्टुडिओज आणि ऑरा प्रोडक्शन्स या तीन निर्मिती संस्थांनी एकत्र येऊन “कुर्ला टू वेंगुर्ला” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अमरजित आमले, विजय कलमकर, चारुदत्त सोमण, नयना सोनावणे, अविनाश सोनावणे आणि एम. व्ही. शरतचंद्र हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लेखन अमरजित आमले यांनी केले असून, त्यांनी एका साध्या पण हृदयस्पर्शी कथेला योग्य शब्दांत मांडले आहे. दिग्दर्शनाची धुरा विजय कलमकर यांनी सांभाळली असून, त्यांनी या कथेला पडद्यावर प्रभावीपणे जिवंत केले आहे. रंगनाथ बाबू गोगीनेनी यांनी आपल्या कॅमेऱ्यातून वेंगुर्ल्याचे सौंदर्य आणि कथेतील भाव अचूक टिपले आहेत, तर विजय कलमकर यांनी चित्रपटाचे संपादन केले आहे. चित्रपटातील गीतांना चंचल काळे आणि अमरजित आमले यांनी शब्दबद्ध केले आहे, तर अक्षय खोत यांनी संगीत दिग्दर्शन आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे. त्यांचे संगीत प्रेक्षकांच्या मनात घर करेल अशी अपेक्षा आहे.
या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे, याचे चित्रीकरण वेंगुर्ला येथेच झाले आहे. त्यामुळे वेंगुर्ल्याच्या निसर्गरम्य वातावरणासोबतच, इथली संस्कृती आणि जनजीवन मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. चित्रपटाचे कला दिग्दर्शन मंदार पेडणेकर जे देवगडचे आणि श्रीधर मेस्त्री मालवण चे सुपुत्र यांनी केले आहे. त्यांनी कोकणातील मातीचा सुगंध आणि घराघरातील गोष्टी पडद्यावर प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
“कुर्ला टू वेंगुर्ला” हा केवळ एक मनोरंजक चित्रपट नाही, तर तो सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कला आणि संस्कृतीला प्रकाशात आणणारा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. स्थानिक कलाकारांच्या प्रयत्नांना दाद देण्यासाठी आणि या चित्रपटाच्या यशासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवे. १९ सप्टेंबर रोजी जवळच्या चित्रपटगृहात जाऊन या प्रवासाचे साक्षीदार व्हा आणि या स्थानिक निर्मितीला भरभरून प्रतिसाद द्या !