दोडामार्गवरून बेळगाव - चंदगड बस फेऱ्या सुरु करा

Edited by: लवू परब
Published on: December 04, 2024 18:20 PM
views 71  views

दोडामार्ग : दोडामार्ग वरून सावंतवाडी ते आंबोली-चौकुळ-इसापूर-तेरवण मार्गे बेळगाव व चंदगड अशा बस फेऱ्या सुरु कराव्यात अशी मागणी दत्ताराम विष्णू गांवकर यांनी नुकतीच परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे, सावंतवाडी, दोडामार्ग आणि चंदगड अशा तिन्ही तालुक्यातील अति दुर्गम भागत  आंबोली, चौकुळ, इसापूर, तेरवण अशी गावे आहेत. सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील असलेल्या या दुर्गम गावातील शालेय व महाविद्यालयीन  मुलांना येण्याची व जाण्याची सोय उपलब्ध नाही आणि पर्याय सुद्धा नाही आहे. सद्यस्थितीत सावंतवाडी आगाराची बस आंबोली, चौकुळ कुंभवडे अशी बारमाही चालू आहे. तसेच चंदगड आगाराची बस सद्यस्थितीत चंदगड ते पारगड अशी बारमाही चालू आहे. तेरवण मधील ग्रामस्थांना दोडामार्ग तहसील कार्यालय किंवा अन्य कामानिमित्त दोडामार्गात येण्याची व जाण्याची सोय नाही आहे. त्यामुळे अनेकांना एखादे काम किंवा अन्य कारणास्तव तालुक्यात आल्यावर दोन दोन दिवस जाण्याची सोय नाही. शिवाय त्यांना डोंगर उतरून खाली मेढे किंवा तिलारीत चालत यावे लागते. त्यामुळे सगळा डोंगराळ भाग असून पायवाट असल्यामुळे आणि जंगली जनावरे यांची भीती असते. पण नाईलाजास्तव यावेच लागते. 

तसेच या ग्रामस्थांना आरोग्य सेवेसाठी (हॉस्पिटल) सावंतवाडी व सिंधुदुर्गात सोय नसल्यामुळे कोल्हापूर, बेळगाव येथे महागड्या हॉस्पिटल मध्ये जावे लागते. म्हणून दोडामार्ग वरून सावंतवाडी व्हाया आंबोली- चौकुळ- इसापूर-तेरवण- मोटणवाडी मार्गे चंदगड अशी एक बस फेरी सुरु करण्यात यावी. या गाडीची वेळ ही सकाळी ६ वाजता चंदगड वरून सुटणारी असावी व दुपारी १:३० वाजता दोडामार्ग वरून सुटणारी असावी अशी निश्चित करून बस उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच या मार्गावरून वैभववाडी-बेळगाव अशी बससेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी  दत्ताराम विष्णू गांवकर, निखिल मुकुंद राऊळ, सुदेश राघो कडव, सत्यवान भोसले, तुकाराम गवस यांनी निवेदनाद्वारे केली आहे.