
वैभववाडी : जांभवडे येथील २१ वर्षीय तरुणीला आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गावातीलच दशरथ आत्माराम बोलये (वय ४५) याच्याविरोधात वैभववाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असता त्याची प्रकृती खालावल्याने त्याला वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी आई-वडिलांसोबत जांभवडे येथे राहते. तिची आई एका हॉटेलमध्ये कामाला जाते, तर वडील मोलमजुरीसाठी दिवसभर घराबाहेर असतात. संशयित बोलये आणि तरुणीच्या वडिलांचे जवळचे संबंध असल्याने त्याचे त्यांच्या घरी येणे-जाणे होते. त्यामुळे तरुणी घरात एकटी असल्याची माहिती त्याला होती, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.१५ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घरात कोणी नसल्याची संधी साधून संशयित तरुणीच्या घरी गेला. त्याने तिच्यावर जबरदस्ती केली. तरुणीने विरोध केला असता आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यानंतर १५ ते १७ सप्टेंबर या कालावधीत त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकाराची माहिती कुणाला दिल्यास आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी दिल्यामुळे तरुणी घाबरली होती. तसेच, ‘मी दररोज येणार,’ अशी धमकीही दिल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. अखेर तिने आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती चुलत बहिणीला दिली. चुलत बहिणीने हा प्रकार तरुणीच्या आईला सांगितल्यानंतर तरुणी आणि तिची आई यांनी वैभववाडी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी तातडीने कारवाई करत संशयित दशरथ बोलये याला ताब्यात घेतले. मात्र, पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू करण्यापूर्वीच त्याची प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला तत्काळ वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी त्याला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याची प्रक्रिया सुरू होती.या घटनेमुळे जांभवडे परिसरात खळबळ उडाली असून, प्रकरणाचा पुढील तपास वैभववाडी पोलिस करीत आहेत.










