LIVE UPDATES

कीटकनाशक प्राशन केलेल्या कोकीसरेतील तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Edited by: कोकणसाद Live न्यूज नेटवर्क
Published on: September 19, 2026 20:09 PM
views 42  views
Kokansad Live # sindhudurg news #breaking news

वैभववाडी,  : कीटकनाशक प्राशन केल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून उपचार सुरू असलेल्या कोकिसरे-ओझरवाडी येथील निलेश प्रभाकर आंबेरकर या युवकाचा शनिवारी (ता. १९) रात्री अडीचच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती त्यांचे नातेवाईक गणेश विजय मांजरेकर यांनी पोलिसांना दिली आहे.

 निलेश आंबेरकर हे नापणे येथील एका उद्योगपतीच्या बागेत काम करीत होते. बागेच्या व्यवस्थापनाची जबाबदारीही ते पाहत होते. दरम्यान, ११ सप्टेंबर रोजी त्यांनी बागेत आंबा व काजू पिकांवर फवारणीसाठी वापरण्यात येणारे कीटकनाशक प्राशन केले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृतीत काहीशी सुधारणा झाल्यानंतर दोन-तीन दिवसांपूर्वी त्यांना घरी आणण्यात आले होते. मात्र, पुन्हा प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

 निलेश यांनी कीटकनाशक का प्राशन केले, यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे परिसरात विविध चर्चा सुरू असून, प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी मागणी होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.