
रत्नागिरी : ढोल-ताशे, बेंजो आणि गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत गणेशभक्तांनी शनिवारी सायंकाळी गौरी-गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. जिल्ह्यात आज १ लाख १५ हजार २५१ गणरायांना निरोप देण्यात आला.
विसर्जनावेळी नदीकिनारे व समुद्रकिनारे गर्दीने अक्षरशः फुलून गेले. काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी विनंती करत गणरायाचे विसर्जन करण्यात आले. डिजेमुक्त विसर्जन मिरवणुका निघाल्या. तसेच ढोल ताशांचाही गजर थोडा कमी होता.
आरत्या, भजनांनी जिल्हा गणेशमय झाला होता. दीड दिवस व पाच दिवसांच्या गणपतींना निरोप दिल्यानंतर शनिवारी गौरी-गणपतीला निरोप देण्यात आला. शनिवारी सायंकाळी ४ वाजल्यानंतर उत्तरपूजा करून गणेश विसर्जन मिरवणुकांना सुरवात झाली. हातगाडी, चारचाकी, रिक्षा, टेंपो आदी वाहनांतून गणरायाची स्वारी निघाली.
शहरातील मांडवी समुद्रकिनाऱ्यावर प्रचंड गर्दी झाली. निरोपाची आरती केल्यानंतर भक्तांनी गणरायाचे समुद्रात विसर्जन केले. शहरात कृत्रिम तलावांमध्येही गणपतीचे विसर्जन करण्यात येत होते. याकरिता नगरपालिकेने चोख व्यवस्था केली. मांडवी समुद्रकिनार्यावर दरवर्षीप्रमाणे नगरपालिकेने निर्माल्य संकलनासाठी कलश ठेवले. याशिवाय सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन सहकार्य केले.
विसर्जनावेळी चोख पोलिस बंदोबस्त पाहायला मिळाला. मांडवीत फक्त गणेशमूर्ती असलेल्या वाहनांना प्रवेश दिल्याने कोणतीही वाहतूक कोंडी झाली नाही. मंगलमूर्ती प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पक्षाने गणरायावर पुष्पवृष्टी केली. रात्री १० वाजेपर्यंत गणेश विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. समुद्रावर पोलिसांचा जागता पाहारा होता. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.










