
कुडाळ : कस्तुरी पाताडे या युवतीच्या मृत्यूनंतर कुडाळमधील आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी आणि डॉक्टरांच्या वागणुकीवरून जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कुडाळ येथे आयोजित जाहीर सभेत, पंडित डॉक्टर यांच्या रुग्णालयातील डॉ. नागवेकर यांची सेवा तातडीने बंद करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. तसेच खासगी रुग्णालयांच्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी 'रेटकार्ड' सक्तीचे करण्याची मागणीही यावेळी लावून धरण्यात आली.
सभेत उमटलेले महत्त्वाचे पडसाद ; चौकशी आणि कारवाईची मागणी
अभय शिरसाट यांनी कस्तुरीला श्रद्धांजली अर्पण करत संताप व्यक्त केला. "नातेवाईक जेव्हा विचारणा करायला गेले, तेव्हा त्यांना मिळालेली वागणूक अत्यंत चुकीची होती. डॉक्टरांनी याचे भांडवल करण्याची गरज नाही. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी रुग्णालयांवर कडक कारवाई व्हायला हवी," असे ते म्हणाले. अमित सामंत यांनीही मुंबई नर्सिंग ॲक्टप्रमाणे सखोल चौकशीची मागणी केली.
प्रसाद शिरसाट यांनी जिल्ह्यातील कमकुवत आरोग्य यंत्रणेवर बोट ठेवले. "जिल्हा रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज यांच्यात ताळमेळ नाही. सरकारी रुग्णालयात साध्या सुविधा नसल्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागते, जिथे डॉक्टर स्वतःच्या मर्जीने पैसे उकळतात," असा आरोप त्यांनी केला. खासगी रुग्णालयांनी उपचारांचे रेटकार्ड जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली.
सभेत डॉक्टरांची समिती नेण्याच्या प्रस्तावावर दादा पडते यांनी तीव्र आक्षेप घेतला. "या कमिटीत डॉक्टर नकोत, कारण ते नेहमी एकमेकांचीच बाजू घेतात. एका गरीब मुलीचा मृत्यू झाला, याचे त्यांना काहीच दुःख वाटले नाही का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
काका कुडाळकर आणि धीरज परब यांनी डॉक्टरांच्या 'ओपीडी' बंद ठेवण्याच्या भूमिकेवर टीका केली. "आम्ही डॉक्टरांना देवदूत मानतो, पण एका मुलीचा बळी गेल्यावर संवेदनशीलता दाखवण्याऐवजी, नातेवाईकांना खंडणीखोर ठरवणे चुकीचे आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले. जर नर्सिंग ॲक्टनुसार कारवाई झाली, तर डॉक्टरांना पळता भुई थोडी होईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
धीरज परब यांनी द महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ऍक्ट इंडियन मेडिकल कौन्सिल कोड ऑफ मेडिकल एथिक्स
यावेळी या कायद्यांची माहिती दिली. डॉ. नागवेकर यांची कुडाळमधील सेवा कायमस्वरूपी बंद करणे. खासगी रुग्णालयांमध्ये उपचारांचे 'रेटकार्ड' प्रदर्शित करणे अनिवार्य करणे. जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांची भेट घेऊन सरकारी रुग्णालयातील सुविधा सुधारण्यासाठी पाठपुरावा करणे. कस्तुरी पाताडे मृत्यू प्रकरणाची सखोल न्यायालयीन चौकशी व्हावी. या सभेमुळे कुडाळमधील वातावरण तापले असून, आता प्रशासन आणि आरोग्य विभाग यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अभय शिरसाट, अमित सामंत, काका कुडाळकर, धीरज परब, प्रसाद शिरसाट, संदेश पडते, दादा पडते, रत्नाकर प्रभू, उमेश परब, अँडव्होकेट गवंडे आधी नागरिक उपस्थित होते.












