LIVE UPDATES

कणकवली नगराध्यक्षांकडून केवळ घोषणाबाजी

नगरसेवक बंडू हर्णे यांची टिका
Edited by: उमेश बुचडे
Published on: May 22, 2026 18:58 PM
views 40  views

कणकवली : कणकवली शहरातील उड्डाणपुलाखाली विविध विकासकामे करण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केली. मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभागाची परवानगी मिळणे शक्य नसलेल्या कामांची घोषणाबाजी त्‍यांनी केली आहे. साऊंड प्रूफ योगा केंद्र, सेल्फी पॉईंट, नाट्यगृह, कलादालन, प्रसाधनगृह अशी कामे उड्डाणपुलाखाली होऊच शकत नाहीत. केवळ जॉगिंग ट्रॅक आणि खुले बॅडमिंटन कोर्ट यांसारखीच कामे शक्य आहेत. त्यामुळे जी कामे होऊच शकणार नाहीत, त्यांचीही कणकवली नगराध्यक्षांकडून घोषणाबाजी सुरू असल्याची टिका माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान स्विकृत नगरसेवक बंडू हर्णे यांनी केली.

कणकवली शहरातील माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या कार्यालयात आज भाजपचे नगरसेवक बंडू हर्णे यांनी पत्रकार परिषद घेत नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या कारभारावर जोरदार टीका केली. यावेळी नगरसेविका मेघा गांगण आणि नगरसेवक संजय कामतेकर उपस्थित होते. बंडू हर्णे म्हणाले, सध्या उड्डाणपुलाखालील १ कोटी २१ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळालेली असून, हा निधी मूळतः पटवर्धन चौकाच्या सुशोभीकरणासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजनमधून मंजूर केला होता. या निधीतून उड्डाणपुलाखालील पटवर्धन चौक परिसराचे सौंदर्यीकरण होणार होते. तसेच कणकवली व्यापारी संघाच्या माध्यमातूनही त्या परिसरात सुशोभीकरणाची कामे प्रस्तावित होती. मात्र, संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधाऱ्यांनी पटवर्धन चौकातील कामे रद्द करून श्रीधर नाईक चौक ते प्रांत कार्यालय या भागात जॉगिंग ट्रॅक व इतर कामांना मंजुरी दिल्याचा आरोप त्यांनी केला.

हर्णे म्हणाले, श्रीधर नाईक चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या परिसरातील उड्डाणपुलाखालील सौंदर्यीकरणाची कामे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून होणार होती. त्याच भागात नगरपंचायतीमार्फत पुन्हा विकासकामांना मंजुरी देऊन निधीचा अपव्यय सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. कणकवली शहरातील २१ विकासकामांसाठी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यानुसार निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली होती. १४ ठेकेदारांपैकी तीन ठेकेदारांना कामे मंजूर करण्यात आली होती. यामध्ये पटवर्धन चौक ते किनई रोड डांबरीकरण तसेच परबवाडी, पिळणकरवाडी आणि बीजलीनगर परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीचा समावेश होता. मात्र, नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी नगरपंचायत सभेत ठराव आणून ही कामे रद्द केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे आगामी पावसाळ्यात नागरिकांना चिखलातून मार्ग काढावा लागणार असल्याचेही ते म्हणाले.

नगराध्यक्षांच्या मनमानीला मुख्याधिकारी देखील साथ देत असल्याचा आरोप करत हर्णे म्हणाले, विकासकामांच्या निविदा रीतसर झालेल्या असतानाही नगरपंचायत सभेत बेकायदेशीर ठराव करून ती कामे रद्द करण्यात आली. अशा वेळी मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नसल्याने भाजपला जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागावी लागली. याबाबत दोन्ही बाजूंची मते जिल्हाधिकाऱ्यांनी ऐकून घेतली असून निर्णय अद्याप प्रलंबित आहे.

 विकासकामे घेणाऱ्या ठेकेदारांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठीच मंजूर कामे रद्द करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच पटवर्धन चौकाच्या सुशोभीकरणाबाबत व्यापारी संघ आता गप्प का आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कणकवली नगरपंचायत निवडणुकीदरम्यान विद्यमान नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी उड्डाणपुलाखालील फेरीवाल्यांकडून महिन्याला साडेआठ लाख रुपयांचा हप्ता घेतला जात असल्याचा आरोप केला होता. तसेच फेरीवाल्यांना हटवण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र अद्याप परिस्थिती जैसे थे असल्याने आता हा हप्ता सत्ताधाऱ्यांकडे जातोय का, याचे उत्तर नगराध्यक्षांनी द्यावे, अशी मागणी हर्णे यांनी केली. गेल्या पाच महिन्यांत नगरपंचायतीला शहरातील विकासकामांचे एकही मोठे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवता आलेले नाहीत. सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यात कोणताही ताळमेळ नसून नगरपंचायत निधीतून केवळ फुटकळ कामे सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.