
वैभववाडी : कणकवलीहून मौदेकडे जाणाऱ्या एसटी बसला शुक्रवारी (ता. १८) रात्री आखवणे धरणाजवळ अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस सुमारे शंभर फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने या अपघातात बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असून, कोणालाही दुखापत झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
कणकवलीहून मौदेला वस्तीला जाणारी एसटी बस शुक्रवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे रवाना झाली होती. आखवणे धरणाजवळील चढण पार करून बस मौदेकडे जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस रस्त्यालगतच्या सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळली.
अपघाताची माहिती मिळताच हेत येथील सुशील कदम, संदेश सावंत, श्री. जामदार यांच्यासह हेत-आखवणे परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी तत्काळ मदतकार्य करत बसमधील प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर सर्व प्रवाशांना त्यांच्या घरी पोहोचविण्यात आले.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वैभववाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर तसेच एसटी महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. चालकाची मद्यपान तपासणी करण्यासाठी त्याला वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. अपघातामुळे रात्रीच्या वेळी काही काळ परिसरात खळबळ उडाली होती.










