LIVE UPDATES

Kalwande Dam : २७ कोटींची दुरुस्ती ७६ कोटींवर

लघु पाटबंधारे विभागाच्या 'गतिमान' कारभारामुळे कळवंडे धरण संकटात
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 24, 2026 12:08 PM
views 37  views

चिपळूण : तीन वर्षांपूर्वी नादुरुस्त झालेल्या कळवंडे धरणाच्या दुरुस्तीसाठी अंदाजपत्रक तयार करण्यातच लघु पाटबंधारे विभागाने तब्बल तीन वर्षे घालवली आहेत. सुरुवातीला २७ कोटी असणारा दुरुस्तीचा खर्च आता थेट ७६ कोटी रुपयांवर पोहोचल्याने प्रशासनाच्या या सोयीस्कर दिरंगाईवर ग्रामस्थांमधून तीव्र टीका होत आहे. धरणात अवघा नगण्य पाणीसाठा ठेवल्यामुळे चिपळूण परिसरातील ५ गावांवर पाण्याचे भीषण संकट ओढावले असून, प्रसिद्ध 'कृषी पंढरी' कळवंडे गावातील भाजीपाला शेती कोमेजली आहे. यामुळे स्थानिक २५० हून अधिक महिलांचा रोजगार ऐरणीवर आला आहे.

४६ वर्षांपूर्वी काही एकर जागेत हे धरण साकारण्यात आले. यासाठी संपादित केलेल्या जागांचा त्यावेळी १ हजार ते १६०० रुपये इतकाच मोबदला देण्यात आल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. मात्र, गाव सुजलाम सुफलाम व्हावे म्हणून कवडीमोल किमतीने जागा देण्यात आल्या.

धरण झाल्यापासून याचा फायदा केवळ कळवंडे गावाला होत नसून पाचाड, रेहेळे-भागाडी, कोंढे, शिरळ आदी गावांना होत आहे. या धरणामुळे या गावांचा पूर्णपणे कायापालट झाला आहे. कळवंडे गावाने तर पाणी आणि आपली मेहनत याच्या बळावर गावाला कृषी पंढरी अशी नवी ओळख मिळवून दिली आहे.

असे असताना तीन वर्षांपूर्वी एका भागात पाणी झिरपत असल्याचा शोध लावत लघु पाटबंधारे विभागाने त्यावर पिचिंग केले. मात्र ही पिचिंग पहिल्याच पावसात वाहून गेले. पाणी झिरपण्याचा प्रकार धरण बांधल्यापासून सुरू होता. केवळ पावसाळा आला की पाणी झिरपणे सुरू होत असे. असे असतानाही सुमारे ४९ लाख रूपयांचा निधी खर्चा घालायचा म्हणून काही अधिकाऱ्यांनी दुरुस्तीचा खटाटोप केल्याचा आरोप तेव्हापासून आजपर्यंत ग्रामस्थांमधून होत आहे. धरण नादुरुस्त असल्याने तेव्हापासून आजपर्यंत धरणात कमी पाणीसाठा केला जात आहे. याचा

फटका कळवंडेसह अन्य गावातील ग्रामस्थांना बसत आहे. यावर्षी तर कळवंडे गावात आतापासूनच भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याअभावी शेतीही धोक्यात आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. धरणाच्या पाण्यावर शेतकरी भात पिकासह काकडी, चिबुड, दुधी, भोपळा, पडवळ, मिरची,

भेंडी, पाल्याभाज्यांचे उत्पादन घेत असून त्याची बाजारपेठेत विक्री केली जाते अर्ध्या शहराला पुरेल इतका भाजीपाला याच गावातून येत होता. मात्र गेल्या तीन वर्षापासून या उत्पादनात घट झाली आहे. यावर्षी तर पिण्यासाठीच पाणी नसल्याने शेती, भाजीपाला न करण्याचा एकमुखी निर्णय गावाने घेतला आहे. त्यामुळे सुमारे २५०

महिलांचा रोजगार बुडत आहे. एकीकडे शासन बचतगट व अन्य मार्गांनी महिलांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न करीत असताना दुसरीकडे मात्र येथील महिलांचा रोजगार हिरावून घेतला जात आहे. याचा कोणी विचार करणार आहे की नाही, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

२०२३ साली धरण नादुरुस्त झाल्यावर दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. ते २७कोटीचे होते त्यानंतर त्यात बदल होत काही महिन्यांपूर्वी ४१ कोटीचे करण्यात आले होते. मात्र एका विभागाने यात आणखी बदल सुचवले असून त्याचा विचार करता ते ७६ कोटीवर जाणार आहे.

काहीही करुन घरण सुस्थितीत करा

"घरणाच्या नादुरुस्तीला अधिकारी जबाबदार आहेत, तरीही त्याचे परिणाम आम्ही ग्रामस्थ भोगत आहोत, त्यामुळे लघु पाटबंधारे विभागाने काहीही करावे आणि शासनाकडून निधी उपलब्ध करुन धरणाला तातडीने सुस्थितीत आणून आमचा पाणीप्रश्न मार्गी लावावा".

वसंत उदेग
उद्योजक व प्रगतशील शेतकरी कळवंडे

शासन मंजुरी मिळताच कामाला सुरूवात होईल

धरणाला यापुढे काही धोका होऊ नये अशा पद्धतीने अंदाजपत्रक बनत आहे. यासाठी बरिष्ठांचे मार्गदर्शन होत आहे. सध्या अंदाजपत्रक तयार करण्याचे काम अंतिम टप्यात आहे. त्यानंतर शासनाची मंजुरी व निधी उपलब्ध होताच कामाला सुरुवात होईल.

विपूल खोत
उपविभागीय अभियंता लघु पाटबंधारे विभाग चिपळूण


ताजी बातमी

View all

Damini Palav Murder Case : संशयित साहिल धुरीला आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी
October 24, 2026
कुडाळ मच्छीमार्केटच्या फ्लोरिंग दुरुस्तीचे काम पूर्ण
October 24, 2026
Astha Computer Shopee Sawantwadi
सिंधुदुर्गातील आघाडीचे Multibrand लॅपटॉप आणि कॉम्प्युटर विक्रेते
October 24, 2026
स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या अनिका सुकीला सुवर्ण, अस्मि सावंतला रौप्यपदक
October 24, 2026
संबंधित बातम्या

View all

कुडाळ मच्छीमार्केटच्या फ्लोरिंग दुरुस्तीचे काम पूर्ण
October 24, 2026
Navswayamsiddha award ceremony at Urmi Garba Night in Majgaon, Sawantwadi
Sawantwadi News : 'नवस्वयंसिद्धा' नं नवदुर्गांचा सन्मान
October 24, 2026
Adv. Nakul Parsekar
अ‍ॅड. नकुल पार्सेकर यांच्या साहित्यिक प्रवासाची मुलाखत सह्याद्री वाहिनीवर
October 24, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत वक्तृत्व स्पर्धेत पाटये पुनर्वसन शाळेचे यश
October 24, 2026