
सावंतवाडी : माजी शालेय शिक्षणमंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त १९ जुलै रोजी सावंतवाडी येथे सावंतवाडी तालुका शालेय स्तरावर फक्त मुलगे या गटासाठी कबड्डी स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन आयोजित व नगरसेवक देव्या सूर्याजी मित्रमंडळ पुरस्कृत केली आहे.
ही स्पर्धा सावंतवाडी बाजारपेठेतील जयप्रकाश चौक येथील शांतीनिकेतन शाळेच्या पटांगणावर सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू होणार आहे. या गटात १८ वर्षांखालील मुलांना कबड्डी स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. त्यासाठी खेळाडूंनी आपली जन्मतारीख दाखल्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड सोबत आणावे. स्पर्धेतील विजेत्या गटातील स्पर्धकांना रोख रक्कमेची पारितोषिके व चषक दिले जाणार आहेत. शालेय स्तरावरील मुलांच्या संघांनी १८ जुलैपर्यंत नावे नोंदवावीत. तालुक्यातील शाळांनी जास्तीत जास्त आपल्या शाळेतील मुलांचा संघ या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन देव्या सूर्याजी मित्रमंडळातर्फे करण्यात आले. नाव नोंदणीसाठी प्रसाद देऊलकर, सावंतवाडी किंवा जिल्हा कबड्डी फेडरेशनचे पदाधिकारी दिनेश चव्हाण किंवा मार्टिन अल्मेडा यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.










