LIVE UPDATES

२ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्गात जल अर्पण दिवस

पाणीपुरवठा योजनांचे ग्रामसमुदायाकडे औपचारिक हस्तांतरण
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 30, 2026 10:19 AM
views 25  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सिंधुदुर्गनगरी : जल जीवन मिशन अंतर्गत गावातील पाणीपुरवठा योजनांचे औपचारिक हस्तांतरण ग्रामसमुदायाकडे करण्याच्या उद्देशाने दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्ह्यात ‘जल अर्पण दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ‘हर घर जल’ घोषित झालेल्या आणि पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊन सुरळीत पाणीपुरवठा सुरू असलेल्या गावांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी दिली.

जल अर्पण कार्यक्रमापूर्वी संबंधित ग्रामपंचायतीमध्ये १५ ते २० दिवसांचा ट्रायल रन पूर्ण झाल्याची खात्री करण्यात येणार आहे. या कालावधीत आढळणाऱ्या तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करण्यात येणार आहेत. तसेच ग्रामपंचायत व ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती (VWSC) यांच्या माध्यमातून ‘ट्रान्सेक्ट वॉक’ करून पाणीपुरवठा योजनेची प्रत्यक्ष पाहणी व तपासणी करण्यात येणार आहे.

पाणीपुरवठा योजनेशी संबंधित नकाशे, मालमत्ता नोंदवही, पाणी गुणवत्ता तपासणी अहवाल, देखभाल व दुरुस्ती (O&M) आराखडा तसेच आवश्यक कागदपत्रे ग्रामपंचायत व VWSC कडे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्रामसभेच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना आणि पाणी गुणवत्तेबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

जल अर्पण दिवसाच्या दिवशी ग्रामसभेत ग्रामस्थांना पाणीपुरवठा योजनेचे हस्तांतरण, योजनेची देखभाल व दुरुस्ती तसेच पाणी गुणवत्तेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात महिला बचत गट, युवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामस्थ, भजनी मंडळे आणि लोकप्रतिनिधी यांचा सक्रिय सहभाग घेण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येणार असून, प्रभात फेरीच्या मार्गावर आकर्षक रांगोळी काढून पाणी व स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

‘जल बंधन’द्वारे गावाची जबाबदारी निश्चित

जल अर्पण कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याच्या टाकीला ‘जल बंधन’ करण्यात येणार आहे. यामधून ‘आजपासून ही पाणीपुरवठा योजना गावाची असून, तिची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी गावाची राहील’, असा संदेश ग्रामस्थांना देण्यात येणार आहे.

गावातील पाणीपुरवठा योजना केवळ शासनाची मालमत्ता न राहता ग्रामसमुदायाच्या सहभागातून तिचे योग्य व्यवस्थापन, देखभाल व संवर्धन व्हावे, हा ‘जल अर्पण’ उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे पात्र गावांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक बाबींची पूर्तता करून दि. २ ऑक्टोबर रोजी ‘जल अर्पण’ कार्यक्रम उत्साहात साजरा करावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी केले आहे.