
सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र २०२६’ अंतर्गत भोसले नॉलेज सिटी येथे आयोजित रोजगार मेळावा उत्साहात संपन्न झाला.
या रोजगार मेळाव्याचे ऑनलाइन उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. या रोजगार मेळाव्यात विविध उद्योग व सेवा क्षेत्रांतील १४ कंपन्यांनी सहभाग घेतला. या कंपन्यांमार्फत एकूण ४२३ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली.
डिप्लोमा, आयटीआय, अभियांत्रिकी, फार्मसी, पदवी तसेच विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. यावेळी एकूण ८० उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यामध्ये ५२ पुरुष आणि २८ महिला उमेदवारांचा समावेश होता.
प्राथमिक निवड प्रक्रियेत ५३ उमेदवारांची निवड झाली. त्यापैकी अंतिम निवड प्रक्रियेत १३ पुरुष आणि ३ महिला अशा एकूण १६ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. २५ उमेदवारांचा निकाल अंतिम फेरी बाकी असल्याने राखून ठेवण्यात आला असून ते प्रतीक्षा यादीत आहेत.
या रोजगार मेळाव्यात क्वालिटी टेक्निकल सोल्युशन्स, सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स, श्रीपज्ञी इम्पेलर, टॅलेंटराईज सर्व्हिसेस, ओंकार फार्मा, वेदांता मेडिकेअर, आकाश फिशमील अँड फिश ऑइल, मणिपाल बँकिंग, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, साई प्रोजेक्ट, सोडेक्सो इंडिया, एचएफसीएल आणि झायडस कॅडिला आदी कंपन्यांचे एचआर अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्वांचे संस्थेतर्फे पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.
उद्घाटन कार्यक्रमावेळी भोसले नॉलेज सिटीचे सीईओ ले. कर्नल डॉ. रत्नेश सिन्हा, यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. रमण बाणे, यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. विजय जगताप तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने एम्प्लॉयमेंट ऑफिसर निखिल दावणे उपस्थित होते.
रोजगार महाकुंभाच्या यशस्वी आयोजनासाठी वायबीआयटीचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागप्रमुख मिलिंद देसाई, टीपीओ महेश पाटील, वायबीसीपीच्या टीपीओ हेड नमिता भोसले आणि टीपीओ प्रियंका यादव यांनी विशेष परिश्रम घेतले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










