LIVE UPDATES

जि. प. अध्यक्ष , CEO डॉ. अपूर्वा बासुर यांचा सावंतवाडी दौरा

दुष्काळ पार्श्वभूमीवर जलसंधारण व विकासकामांची पाहणी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 30, 2026 11:21 AM
views 28  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सावंतवाडी : जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासोबतच दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण व पाणीपुरवठ्याच्या कामांना प्राधान्य देण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी सावंतवाडी तालुक्याचा संयुक्त दौरा केला. या दौऱ्यात नेमळे, वेत्ये, बांदा आणि भालावल येथे विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.

नेमळे येथे श्रमदानातून उभारण्यात येणाऱ्या वनराई बंधाऱ्याच्या बांधकामाचा तसेच VB-GRAM-G अंतर्गत जलतारा खड्डा कामाचा शुभारंभ करण्यात आला. सध्याच्या पाणीटंचाईसदृश परिस्थितीत गावपातळीवर पाणी अडविणे, पाण्याचे पुनर्भरण करणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी अशा कामांना गती देण्याच्या दृष्टीने यावेळी आढावा घेण्यात आला. लोकसहभागातून जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात आला.

वेत्ये येथे जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीची पाहणी करण्यात आली. तसेच योजनेतील नळजोडणीच्या कामाची पाहणी करून पाणीपुरवठा योजनेचा लाभ नागरिकांना वेळेत मिळण्यासाठी आवश्यक कामे गतीने पूर्ण करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या.

 बांदा येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ ला भेट देऊन पीएश्री शाळा अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या डिजिटल क्लासरूमसह विविध शैक्षणिक सुविधांची पाहणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेण्यात आला. तसेच शाळेतील शौचालय व अन्य मूलभूत सुविधांची पाहणी करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींवर चर्चा करण्यात आली.

भालावल ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गावपातळीवर करावयाच्या उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले. यावेळी १५ वा वित्त आयोग, प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण, जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती-जमाती विकास कार्यक्रम आणि VB-GRAM-G यासह विविध योजनांच्या कामांचा आढावा घेऊन आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. 

भालावल येथे VB-GRAM-G अंतर्गत सन २०२६-२७ मध्ये करण्यात आलेल्या काजू लागवडीची पाहणी करण्यात आली. लाभार्थी रामचंद्र वामन परब यांच्या काजू लागवड क्षेत्रास भेट देऊन कामाची पाहणी करण्यात आली. तसेच जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत बांधण्यात आलेल्या प्राथमिक शाळेच्या नवीन इमारतीची पाहणी करण्यात आली. अंगणवाडी भालावल येथे भेट देऊन एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची पाहणी करण्यात आली. बालकांना उपलब्ध असलेल्या सुविधा आणि अंगणवाडीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

 यावेळी VB-GRAM-G अंतर्गत लाभार्थी वसंत महादेव परब यांच्या शेतातील बायोगॅस संयंत्र तसेच पशुपालन गोठ्याची पाहणी करण्यात आली. ग्रामीण कुटुंबांना शाश्वत उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या योजनांचा प्रभावी लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने संबंधितांकडून माहिती घेण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या नेतृत्वाखाली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर यांच्या उपस्थितीत झालेल्या या संयुक्त दौऱ्यात विविध विभागांच्या योजनांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांची सद्यस्थिती जाणून घेण्यात आली.

 जलसंधारण, पाणीपुरवठा, शिक्षण, ग्रामविकास आणि उपजीविकेशी संबंधित कामांना गती देत योजनांचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर सातत्याने क्षेत्रीय आढावा घेण्यात येत आहे.