LIVE UPDATES

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात अणसूर ग्रामपंचायत द्वितीय

राज्यस्तरीय मूल्यांकनासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 30, 2026 11:36 AM
views 26  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

वेंगुर्ला : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०२५-२६ अंतर्गत कोकण विभागस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावलेल्या अणसूर ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय मूल्यांकन व तपासणी दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडली. गावाने स्वच्छता आणि विविध विकासात्मक उपक्रमांच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कामाची यावेळी राज्यस्तरीय समितीने प्रत्यक्ष पाहणी केली.

राज्यस्तरीय मूल्यांकनासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालयाच्या अप्पर सचिव सुगंधा पवार, कक्ष अधिकारी नेहा आंगणे, राज्य पाणी व स्वच्छता मिशन, बेलापूरचे कार्यकारी अभियंता प्रशांत म्हात्रे तसेच सहाय्यक कक्ष अधिकारी स्मिता माने यांनी अणसूर ग्रामपंचायतीला भेट देत विविध उपक्रमांची सखोल पाहणी केली.

तपासणी समितीने ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात आलेल्या स्वच्छता उपक्रम, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा व्यवस्था, सांडपाणी व्यवस्थापन, वैयक्तिक स्वच्छता तसेच सार्वजनिक स्वच्छता यांची प्रत्यक्ष पाहणी केली. याशिवाय गावातील विविध प्रकल्प व स्वच्छतेशी संबंधित उपक्रमांची माहिती जाणून घेत समितीने ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे परीक्षण केले. अणसूर ग्रामपंचायतीने स्वच्छतेच्या क्षेत्रात केलेल्या कामाचे समितीच्या सदस्यांनी कौतुक केले.

यावेळी जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य सावंत, स्वच्छता निरीक्षक मनीष पडते, संतोष पाटील, पंचायत समिती वेंगुर्ल्याचे कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, विस्तार अधिकारी पंचायत गुरुनाथ धुरी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अनुप वळवी, द्रौपती नाईक तसेच मुख्यसेविका मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अणसूर ग्रामपंचायतीचे सरपंच सत्यविजय गावडे, ग्रामपंचायत अधिकारी सायली सातोसे, उपसरपंच वैभवी मालवणकर, ग्रामपंचायत सदस्य सीमा गावडे, संयमी गावडे, साक्षी गावडे, प्रज्ञा गावडे, सुधाकर गावडे, वामन गावडे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, डाटा ऑपरेटर, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा सेविका, सीआरपी शीला देऊलकर, मानसी आंगचेकर, कृषी सखी, पशुसखी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी तसेच बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामपंचायत, विविध शासकीय विभाग आणि ग्रामस्थ यांच्यातील समन्वय तसेच ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग यामुळे राज्यस्तरीय तपासणी सुरळीतपणे पार पडली. कोकण विभागस्तरीय स्पर्धेत मिळविलेल्या द्वितीय क्रमांकानंतर आता राज्यस्तरीय स्पर्धेतही अणसूर ग्रामपंचायत उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास सरपंच सत्यविजय गावडे आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला.