
कोकणच्या विकासासाठी युवकांचा एल्गार !
देवगड | प्रतिनिधी
कोकणातील युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, पर्यावरणपूरक उद्योग व विकास प्रकल्पांना गती मिळावी आणि विकासाच्या प्रश्नावर युवकांची एकजूट दिसून यावी, या उद्देशाने 'युवा कोकण'च्या माध्यमातून रविवारी (दि. ५ जुलै) सकाळी १० वाजता भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.ही रॅली दीर्बादेवी स्टॉप, जामसंडे येथून प्रारंभ होऊन हनुमान मंदिर, देवगड किल्ला येथे समाप्त होणार आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने युवक सहभागी होणार असून, कोकणच्या विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.रॅलीचा मुख्य उद्देश म्हणजे कोकणात पर्यावरणपूरक प्रकल्पांना प्रोत्साहन मिळावे, त्यातून स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मिती व्हावी आणि विकासासोबत पर्यावरणाचेही संवर्धन व्हावे, हा आहे. स्वच्छ ऊर्जा, हरित विकास, स्थानिकांना रोजगार आणि समृद्ध कोकण या संकल्पनांवर भर देत ही रॅली आयोजित करण्यात आली आहे.आजही रोजगारासाठी कोकणातील अनेक युवकांना मुंबई, पुणे तसेच इतर राज्यांमध्ये जावे लागते. ही परिस्थिती बदलण्यासाठी कोकणातच उद्योग,रोजगार आणि विकासाच्या संधी निर्माण होणे काळाची गरज असल्याचे आयोजकांचे मत आहे. त्यामुळे विकासाला चालना देणाऱ्या पर्यावरणपूरक प्रकल्पांना पाठिंबा देण्यासाठी युवकांनी या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे."एकजूट हाच विकासाचा खरा मार्ग" हा संदेश देणाऱ्या या रॅलीतून कोकणच्या सर्वांगीण विकासाचा आवाज बुलंद करण्यात येणार आहे. पर्यावरण आणि रोजगार यांचा समतोल साधणाऱ्या विकास मॉडेलच्या समर्थनार्थ युवकांची ही एकजूट भविष्यातील धोरणांवरही प्रभाव टाकणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.रविवारी सकाळी १० वाजता दीर्बादेवी स्टॉप, जामसंडे येथून निघणाऱ्या या भव्य मोटारसायकल रॅलीत युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कोकणच्या विकासासाठी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.










