LIVE UPDATES

57 कोटींच्या नळपाणी योजनेच स्वतंत्र ऑडीट करा !

पालकमंत्र्यांकडे पुरूषोत्तम केनवडेकर यांची मागणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 04, 2026 20:43 PM
views 80  views

 टाक्या उशाला, कोरड घशाला !

सावंतवाडी : शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या २४ × ७ नाणीपुरवठा योजनेअंतर्गत ५७ कोटी रुपयांच्या कामांची स्वतंत्र गुणवत्ता पडताळणी करून अहवाल सार्वजनिक करण्याबाबतची मागणी येथील रहिवासी पुरूषोत्तम केनवडेकर यांनी पालकमंत्री नितेश राणेंकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी पालकमंत्री यांना दिले आहे. स्वतंत्र तांत्रिक व गुणवत्ता तपासणी तज्ञ अभियंत्यांच्या पथकाकडून करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

श्री. केनवडेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  शहरवासीयांना २४x७ तास अखंडित व शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुमारे ५७ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. ही योजना शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून तिची कामे दर्जेदार व नियोजनबद्ध पद्धतीने होणे आवश्यक आहे. परंतू, सद्यस्थितीत या कामांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी आवश्यक तांत्रिक अभियंत्यांची कमतरता असल्याने विविध त्रुटी निर्माण होत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर आजपर्यत झालेल्या सर्व कामांची स्वतंत्र गुणवत्ता तपासणी तज्ञ गुणवत्ता नियंत्रण पथकाकडून करण्यात यावी व त्याबाबतचा सविस्तर अहवाल नागरिकांच्या माहितीसाठी सार्वजनिक करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

शहराला पूर्वी पाळणेकोंड धरण व केसरी बंधारा या पाणी स्रोतां‌द्वारे नियमित पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, शहराचा वाढता विस्तार, नवीन व्यापारी व निवासी संकुले यामुळे पाण्याची मागणी वाढून उपलब्ध पाणी अपुरे पडू लागले. या समस्येवर उपाय म्हणून नगरपरिषद प्रशासनाने पाळणेकोंड धरणावर गोडबोले गेट बसवून धरणाची उंची वाढवली, पाणीसाठा वाढविला तसेच जलशुद्धीकरण केंद्र उभारले. केसरी बंधाऱ्याचे नूतनीकरण करून पाणीसाठा वाढविण्यात आला. तसेच लाखे वसाहत, हेल्थ पार्क, रघुनाथ मार्केट आदी ठिकाणी जलकुंभ उभारण्यात आल्या. मात्र, या जलकुंभांपर्यंत पाणी पोहोचविणाऱ्या आवश्यक जलवाहिन्या न घातल्यामुळे त्या आजही वापरात आलेल्या नाहीत. नरेंद्र डोगर येथील नैसर्गिक झरा योजनेचे नूतनीकरण करण्यात आले. तथापि मार्च महिन्यापासून हा झारा कोरडा पडतो. उभाबाजार परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात आली. मात्र, त्यावरील स्वयंचलित एअर व्हॉल्व्ह प्रत्यक्षात हाताने चालू-बंद करावे लागत असल्यामुळे यंत्रणेतील त्रुटी स्पष्ट होत आहेत असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. 

दरम्यान, पाळणेकोंड धरणावरील गोडबोले गेटची वेळोवेळी देखभाल व दुरुस्ती न झाल्याने अपेक्षित पाणीसाठा राखण्यात अडचणी येत आहेत. तसेच पाळणेकोंड येथील जलशुद्धीकरण केंद्र कार्यरत असले तरी तेथून शहरात पाणी आणण्यासाठी आवश्यक नवीन जलवाहिनी उपलब्ध नसल्यामुळे केंद्राचा पूर्ण क्षमतेने उपयोग होत नाही. केसरी बंधाऱ्याचे नूतनीकरण झाले असले तरी तेथील सुमारे १२५ वर्षापूर्वीच्या जुन्या जलवाहिन्या आजच्या गरजेनुसार पाणी वाहून नेण्यास सक्षम नाहीत. २४ × ७ पाणीपुरबका योजनेअंतर्गत शहरात मोठ्या प्रमाणाबर नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, कामाच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवण्यासाठी सक्षम अभियंता उपल्ब्ध नसल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी एकाच परिसरात पुन्हा-पुन्हा खोदकाम व जलवाहिनी टाकण्याचे प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आले असून याबाबत नागरिकांनी आक्षेप घेत कामही थांबविले होते. एवढ्या मोठ्या योजनेवर सक्षम तांत्रिक देखरेखीचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. यामुळे या संपूर्ण योजनेतील आतापर्यंत झालेल्या सर्व कामांची स्वतंत्र तांत्रिक व गुणवत्ता तपासणी तज्ज अभियंत्यांच्या पथकाकडून करून घेण्यात यावी तसेच त्याचा अहवाल नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ७५ वर्षाचे ज्येष्ठ नागरिक श्री. केनवडेकर यांनी केली आहे. 

टाक्या उशाला, कोरड घशाला !

तसेच शहरात २४ तास पाणीपुरवठा उपलब्ध झालेला नसुन सध्याच्या परिस्थितीत "टाक्या उशाला आणि कोरड घशाला" अशी अवस्था शहरवासीयांवर ओढवली आहे. पाळणे-कोंड धरणावरील गोडबोले गेट, जलशुद्धीकरण प्रकल्प, केसरी बंधारा, इमारत प्रकल्प, नरेंद्र झरा प्रकल्प तसेच शहरातील सर्व माठवण टाक्यांची प्रत्यक्ष पाहणी करावी. अभियंत्यांच्या कामातील उदासीनता, नाकर्तेपणा आणि दुर्लक्ष यांमुळे आपल्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या योजना कोणत्या अवस्थेत पोहोचल्या आहेत, हे आपणास प्रत्यक्ष पाहता येईल. अभियंत्यांनी सावंतवाडीवासीयांचे २४ तास पाणीपुरवठ्याचे स्वप्न अक्षरशः २४ मिनिटांवर आणून ठेवले आहे. तसेच योजनेच्या देखभाल-दुरुस्ती व साहित्यावरील खर्च लाखो रुपयांच्या घरात पोहोचविण्याची किमया साधली आहे. याशिवाय भावी वारसाला वारसाहक्काने अभियंता म्हणून नियुक्ती मिळवून देण्यातही ते यशस्वी ठरले आहेत, ही विशेष बाब आहे. या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी व चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.