दोडामार्ग - सावंतवाडी सीमेवर करोडोची लोहखनीज तस्करी ?

महसूल प्रशासन झोपेत ?
Edited by: संदीप देसाई
Published on: February 04, 2025 19:50 PM
views 183  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गौण खनिज अवैध उत्खननावर महसूल प्रशासन धडक कारवाई करत असताना याच जिल्ह्यात लाखमोलाच्या लोहखनिजाची खुलेआम चोरी होत असताना जिल्ह्यातील महसूल प्रशासन गांधारीच्या भूमिकेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्याच्या सीमेवर हा कोट्यवधीचा मायनिंग घोटाळा आता समोर येत असताना जिल्ह्याचा महसूल विभाग कडक कारवाई करणार का? शासनाच्या बुडणारा लाखो, करोडांचा महसूल वसुल करणार का हा खरा प्रश्न्न आहे. 

खात्रीदायक मिळालेल्या माहितीनुसार मोरगाव, आडाळी पासून कळणे खनिज प्रकल्प अवघ्या ५ किमी वर आहे. येथील प्रकल्पाकडून खनिज उत्तखनन व वाहतूक केली जाते. याचाच फायदा घेऊन काही व्यावसायिकांनी आडाळी, मोरगावमध्ये राज्य मार्गालगत जमिनी भाडे तत्वावर घेतल्या आहेत. त्याच्या आधारे लोहखनीज खरेदी - विक्री व्यवसाय करण्यासाठी खनिकर्म व महसूल कडून परवाने घेतले गेले असल्याचे समजते आहे. त्यासाठी जमिनी तात्पुरत्या एनए (अकृषक ) करण्यात आल्या. आणि कळणे खनिज प्रकल्पातून खनिज विकत घेउन त्याचा साठा करून ते विकले जाणार असा आधार परवाने मिळवताना घेतला जातो. मात्र प्रत्यक्षात कळणे खनिज प्रकल्पा कडून लोहखनिज वाहतुकीचे परवाने ( रॉयल्टी पास ) घेतले जातात. आणि प्रत्यक्ष मात्र खनिज हॆ मोरगाव परिसरातील गावातून काढले जाते. गेल्या वर्षीच्या एप्रिल - मे महिन्यात कोट्यावधीचे खनिज अशाप्रकारे खुलेआम उत्खनन करून विकले गेले. त्याविरोधात तक्रारी झाल्यावर मोरगाव येथील एनए परवाने दोडामार्ग तहसीलदारांनी रद्द केले. मात्र गेल्या आठ दिवसात पुन्हा त्याच ठिकाणावर मातीचे साठे केले जात आहेत. साठा केलेल्या जागेचे परवाने रद्द असतानाही हॆ प्रकार सुरु असल्याचे समजते आहे.

दरम्यान, काही जणांनी याबाबत महसूलकडे फिर्याद नोंदविल्यावर काल ( ता. 3 ) मोरगाव तलाठी यांनी साठा केलेल्या खनिजाची पाहणी करून वस्तुस्थितिचा पंचनामा केला असून संबंधितानावर दंडात्मक कारवाई केली. मात्र आज पुन्हा त्याच ठिकाणी कळणे खनिज प्रकल्पातून लोहखनिज आणून साठवणूक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा महसूल प्रशासन या बड्या डेंड्याच्या अवैध कारनाम्याना आळा कसा घालणार याकडे आम जनतेचे लक्ष लागले आहे. 

खनिज सदृश्य मातीचे उत्खनन व साठा करून वाहतूक करण्याचा हा प्रकार बिनबोभाट पद्धतीने मोरगाव परिसरात सुरु आहे. गेल्या वर्षी गौणखनिजच्या नावाखाली कोट्यवधीचे लोहखनिजाचे उत्खनन व साठे मोरगाव - पडवे माजगाव सीमेवर करण्यात आले. विशेष म्हणजे शासनाची लाखोंचा महसूल बुडवून सुरु असलेल्या या खनिज तस्करीकडे महसूल व पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष् केले गौणखनिज दाखवून खुलेआम यंदाही गेल्या आठ दिवसांपासून दिवस रात्र मोरगाव परिसरातील आडाळी, माजगाव परिसरात उत्तखनन करून लोहखनिज युक्त मातीचा मोरगाव येथे साठा केला जात आहे.  मोरगाव येथे साठा केलेले खनिज गोवा, कर्नाटक राज्यात नेले जात आहे. यां व्यवसायात गोवा येथील बडी धेंडे गुंतलेली असून काही राजकीय पुढऱ्यांना व अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा कोट्यावधीचा खनिज घोटाळा सुरु असल्याची मोठी चर्चा सध्या सुरु आहे. 

उत्खनन सावंतवाडी तालुक्यात साठा मात्र दोडामार्गात

दरम्यान सावंतवाडी तालुक्यातील सीमेवरील गावांत जे उत्खनन होते. त्या उत्खनन केलेल्या खनीज युक्त मातीचा साठा मात्र दोडामार्ग तालुक्यात येणाऱ्या कळणे लागतच्या आडाळी व मोरगाव गावालगत केले जाते. 

उत्खनन केलेल्या मातीत लोहखनिजाची ग्रेड उत्तम दर्जाची?

कळणे खनिज प्रकल्पाच्या परिसरातील काही गावात पृष्ठभागावरील मातीत 48 ते 58 पर्यतच्या ग्रेड चे लोहखनिज आढळते. नेमकं हेच हेरून छोट्या टेकड्या, डोंगर उताराच्या जागा रात्रीच्या वेळी खोदून ही खनिजयुक्त माती काढून साठवली जाते. त्यानंतर कळणे खनिज प्रकल्पाचे खनिज वाहतूक पास वापरून हॆ खनिज म्हणून गोवा, कर्नाटक भागात विकण्यात येते. यातून कोट्यावधीची उलाढाल केली जात असून शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडवला जात आहे. मात्र तरीही खनिकार्म अधिकारी व महसूल, पोलीस प्रशासन कोणतीही कार्यवाही करत नाही. याबद्दल मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.