
कुडाळ : स्थानिक संस्कृती, पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्यांची रुजवणूक करण्याच्या उद्देशाने नेरूर येथील कलेश्वर विद्यामंदिरच्या वतीने चव्हाटा येथे 'गावठी बाजारा'चे आयोजन करण्यात आले होते. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
या बाजाराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, बाजारातील सर्व खरेदी-विक्रीचे कामकाज शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः उत्साहाने आणि आत्मविश्वासाने सांभाळले. या गावठी बाजारात विविध प्रकारच्या रानभाज्या, तसेच अस्सल पारंपरिक खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्वतः ग्राहकांशी संवाद साधत वस्तूंची विक्री केली, ज्यामुळे त्यांच्यामधील आत्मविश्वास व व्यावसायिक कौशल्य दिसून आले.
स्थानिक रानभाज्या आणि पारंपरिक पदार्थांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन वाढावे आणि त्यांच्यात लहानपणापासूनच व्यावसायिक कौशल्यांचा विकास व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. तसेच, आरोग्यदायी जीवनाची सुरुवात, रसायनमुक्त आहाराचे महत्त्व आणि शेतकऱ्यांचा सन्मान याबाबत यावेळी उपस्थितांना मोलाचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्या सौ. अर्चना बंगे, सौ. दिप्ती नाईक, सरपंच सौ. भक्ती घाडी, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक, वालावल मंडळ अधिकारी श्री. तारी भाऊ यांच्यासह विद्यामंदिरचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ व पालक उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या या अभिनव उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.










