LIVE UPDATES

ग्रामीण भागातील शाळांचा विकास ही आपली प्राथमिकता : सुजाता पडवळ

श्री शारदा विद्यालय तुळस शाळेच्या छप्पर दुरुस्ती कामाचे उद्घाटन
Edited by: दिपेश परब
Published on: May 19, 2026 19:22 PM
views 52  views

वेंगुर्ला : तुळस येथील जि.प. शाळा श्री शारदा विद्यालयाच्या इमारतीच्या छप्पर दुरुस्ती कामाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या सुजाता पडवळ यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, शिक्षक व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

गेल्या काही वर्षांपासून शाळेच्या इमारतीचे छप्पर जीर्ण झाल्यामुळे पावसाळ्यात वर्ग खोल्यांमध्ये गळती होत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होत होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम करण्यासाठी या दुरुस्ती कामाची मागणी सातत्याने करण्यात येत होती. अखेर कामाला मंजुरी मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

उद्घाटन प्रसंगी बोलताना जिल्हा परिषद सदस्या सुजाता पडवळ यांनी ग्रामीण भागातील शाळांचा विकास ही आपली प्राथमिकता असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असे त्यांनी नमूद केले.


यावेळी त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणाबाबतही आपले मत व्यक्त करताना सांगितले की, “जिल्हा परिषदेमध्ये महिलांसाठी असलेल्या ५०% आरक्षणामुळेच आज मला जिल्हा परिषद सदस्या म्हणून समाजाच्या प्रश्नांसाठी काम करण्याची संधी मिळाली आणि याच संधीमुळे आज या विकासकामाचे उद्घाटन करण्याचा मानही मला मिळाला. महिलांना प्रतिनिधित्व मिळाल्यास त्या केवळ स्वतःसाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठी कार्य करतात.”

पुढे त्या म्हणाल्या, “आज मला सभागृहात महिला भगिनींचे तसेच ग्रामस्थांचे प्रश्न ठामपणे मांडता येत आहेत. त्यामुळे महिलांना निर्णय प्रक्रियेत अधिक संधी मिळणे आवश्यक आहे. नारी शक्तीचा विचार अधिक सक्षम व्हावा, महिलांचा आवाज अधिक प्रभावीपणे पोहोचावा यासाठी लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढणे ही काळाची गरज आहे. कारण सशक्त महिला म्हणजे सशक्त कुटुंब, सशक्त समाज आणि सशक्त राष्ट्र.”

ग्रामस्थांनी या कामामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले. शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी व ग्रामस्थांनी सुजाता पडवळ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आभार मानले.

कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, ग्रामस्थ, महिला मंडळ सदस्य, युवक वर्ग तसेच विद्यार्थी उपस्थित होते. उद्घाटनानंतर प्रत्यक्ष दुरुस्ती कामालाही सुरुवात करण्यात आली असून लवकरच शाळेची इमारत नव्या स्वरूपात विद्यार्थ्यांच्या सेवेत उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली.