
सावंतवाडी : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भटवाडी येथील ओंकार मित्रमंडळाने आयोजित केलेल्या विशेष प्रदर्शन व दीपावली महोत्सवाचे उद्घाटन आज उत्साहात पार पडले. ग्राहकांना एकाच छताखाली विविध वस्तूंची खरेदी करता यावी, तसेच व्यावसायिकांना आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने हा दीपावली महोत्सव आहे. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले, तर महिला व बालकल्याण सभापती तथा नगरसेविका दीपाली भालेकर यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी ओंकार नवरात्रोत्सव मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भालेकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, नगरसेविका दीपाली भालेकर, पर्यटन व उद्यान सभापती तथा नगरसेविका मोहिनी मडगावकर, दीपक सावंत, विजय सावंत, कुणाल श्रृंगारे, माजी नगरसेवक विलास जाधव, मंडळाचे अध्यक्ष भरत परब, प्रसाद परब, राजा दळवी, भारती परब, पूजा नाईक, ज्योती दुधवडकर, रेखा कुमठेकर, शिवम सावंत, वेदांत मोर्ये, भाग्येश परब, ऋतुजा मोरे, ऋचिका परब, यश दिवणे आदी उपस्थित होते.
नगरसेविका दीपाली भालेकर म्हणाल्या, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या प्रदर्शनाचे आयोजन करणे ही कौतुकास्पद बाब आहे. महिलांना तसेच लघुउद्योजकांना आपल्या व्यवसायाची ओळख निर्माण करून देण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. स्थानिक पातळीवर अशा प्रदर्शनांमुळे व्यावसायिकांना चांगली संधी उपलब्ध होते. नागरिकांनीही या प्रदर्शनाला भेट देऊन खरेदीचा आनंद घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनीही आयोजकांचे कौतुक करताना, सण-उत्सवांच्या निमित्ताने नागरिकांना एकाच ठिकाणी विविध वस्तूंची खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देणे हा चांगला उपक्रम आहे. अशा उपक्रमांमुळे शहरातील व्यापाराला चालना मिळण्यास मदत होते.
ओंकार मित्रमंडळाने सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसोबतच अशा व्यावसायिक उपक्रमांचे आयोजन करून चांगला आदर्श निर्माण केला आहे, असे मत व्यक्त केले. ४, ५ आणि ६ नोव्हेंबर असे सलग तीन दिवस काझी शहाबुद्दीन हॉल, सावंतवाडी येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात खाद्यपदार्थ, दिवाळी फराळ, कपडे व वस्त्र, आकर्षक आभूषणे, गिफ्ट आयटम्स, होम डेकोर, ब्युटी व कॉस्मेटिक्स, हॅन्डिक्राफ्ट्स यांसह विविध प्रकारच्या वस्तूंचे स्टॉल्स ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दिवाळीच्या सणासाठी घराची सजावट, नवीन कपड्यांची खरेदी, भेटवस्तू तसेच विविध आकर्षक वस्तूंची खरेदी करण्यासाठी हे प्रदर्शन नागरिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.
सावंतवाडी शहरासह परिसरातील नागरिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन दिवाळीच्या खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








