
कणकवली : शहरातील नागरिकांना सुरक्षित, प्रकाशमान आणि सुविधायुक्त वातावरण मिळावे, हा नगरपंचायतीचा कायम प्रयत्न आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाच्या माध्यमातून शहरातील विविध ठिकाणी सोलार हायमास्ट उभारण्यात आले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना चांगल्या प्रकाशाची सुविधा मिळणार आहे. सौरऊर्जेवर आधारित ही व्यवस्था पर्यावरणपूरक असून वीज बचतीच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले.
कणकवली नगरपंचायतीच्या हद्दीतील विविध ठिकाणी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) योजनेतून बसविण्यात आलेल्या सोलार हायमास्टचे लोकार्पण सोमवारी सायंकाळी करण्यात आले. कणकवली नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये सोलार हायमास्ट बसविण्यात आले असून, या सुविधेमुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना अधिक प्रकाशाची सुविधा उपलब्ध झाली आहे.
शहरातील श्री गांगेश्वर मंदिर, कणकवली, चौंडेश्वरी मंदिर चौक, कांबळेगल्ली, म्हसकर घराजवळ, शिवाजीनगर, श्री दत्त मंदिर बांधकरवाडी, साईनगर तसेच श्री ब्रह्मणदेव मंदिराजवळ जळकेवाडी या ठिकाणी सोलार हायमास्ट उभारण्यात आले आहेत. या सोलार हायमास्टचे लोकार्पण मुख्याधिकारी गौरी पाटील, नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासह उपस्थित नगरसेवक यांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान, नगराध्यक्ष संदेश पारकर म्हणाले, शहरातील ज्या ठिकाणी रात्रीच्या वेळी प्रकाशाची गरज आहे, अशा ठिकाणी टप्प्याटप्प्याने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. कणकवली शहराच्या विकासासाठी नगरपंचायत प्रशासन, नगरसेवक आणि नागरिकांच्या सहकार्याने यापुढेही विविध विकासकामे मार्गी लावली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर, मुख्याधिकारी गौरी पाटील, अक्षता रोळे, अमोल अघम, रवींद्र महाडेश्वर, प्रदीप गायकवाड, प्रशांत राणे, मनोज तोरसकर, नगरसेवक जयेश धुमाळे, जाई मुरकर, सुमेधा अंधारी, दीपिका जाधव, मेघा गांगण, रुपेश नार्वेकर, लुकेश कांबळे, शितल मांजरेकर, रीना जोगळे, सुमेधा अंधारी, उल्का नाईक, अक्षया सावंत, नीलिमा तांबट, सुवर्णा माणगावकर, प्रसाद अंधारी, अंबाजी राणे, रामदास मांजरेकर, प्रदीप मांजरेकर, निलेश गोवेकर, अमित मांडवकर, सुजित जाधव, साक्षी आमडोसकर, तेजस राणे, दिवाकर मुरकर, उमेश वाळके, सोहम वाळके, सचिन नेरकर, निकीत मुरकर, वैभव मालंडकर आदी उपस्थित होते.












