LIVE UPDATES

कोकणातील तरुणांच्या स्वप्नांना पंख...

कुडाळ येथे एमएसीसीआयएच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन आणि भव्य उद्योजक परिषद
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 06, 2026 17:50 PM
views 207  views

कुडाळ : महाराष्ट्र चेेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर (MACCIA) च्या वतीने दि. १५ व १६ ऑगस्ट २०२६ रोजी कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथे कोकण विभागाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन, नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि भव्य 'उद्योजक परिषद' या विशेष दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

"गाव तिथे उद्योजक" तयार करण्याची संकल्पना महाराष्ट्र चेेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर (MACCIA) या सर्वोच्च संघटनेने मांडली आहे. या माध्यमातून सिंधुदुर्गातील तरुणांना उद्योजक बनवण्याचे स्वप्न पूर्ण होणार असून, तरुणांच्या स्वप्नांना पंख देण्याचे काम एमएसीसीआयए करणार आहे. बँकेतून येणाऱ्या अडचणी, उद्योजक बनण्यासाठीचा मार्ग आणि उद्योजकतेसाठी आवश्यक असणारी प्राथमिक कागदपत्रे याविषयीचे संपूर्ण मार्गदर्शन आता तरुणांना मिळणार असल्याने सिंधुदुर्गातील तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी (परवणी) ठरली आहे. सिंधुदुर्गातच रोजगार व उद्योग उपलब्ध होणार असल्यामुळे येथील तरुणांना आता नोकरीसाठी बाहेर गावी जाण्याची चिंता करण्याची गरज उरणार नाही.

सन १९२६ मध्ये शेठ वालचंद हिराचंद यांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेली एमएसीसीआयए ही संस्था पुढील वर्षी आपल्या शताब्दी वर्षात पदार्पण करत असून, गेल्या ९९ वर्षांपासून महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार आणि उद्योजकांच्या हितासाठी सतत कार्यरत आहे. कुडाळ येथे होणाऱ्या या कार्यक्रमास मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार प्रमोद जठार, आमदार दीपक केसरकर तसेच  जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

तसेच या कार्यक्रमात आशिष पेडणेकर (ट्रस्ट बोर्ड चेअरमन, चेंबर्स ऑफ कॉमर्स), मोहन होडवडेकर (अध्यक्ष, MIDC असोसिएशन), ॲड. नकुल पार्सेकर, कुणाल वरस्कर, विजय केनवडेकर, मनोज वालावलकर, राजन नाईक (कौन्सिल मेंबर) आणि 'गाव ते उद्योजक' चे दोडामार्ग तालुका प्रमुख बाबा टोपले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. एमएसीसीआयएचे अध्यक्ष रवींद्र मानगावे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे. या परिषदेमध्ये उद्योग, व्यापार, कृषी, पर्यटन, एमएसएमई, स्टार्टअप्स, निर्यात, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), कौशल्य विकास, गुंतवणूक, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ यांसारख्या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. कोकणातील उद्योग, व्यापार आणि उद्योगांना चालना देणे, स्थानिक उद्योजकांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडणे, नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन आणि नेटवर्किंगच्या संधी उपलब्ध करून देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.

महाराष्ट्र चेेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर (MACCIA) तर्फे सर्व उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक, स्टार्टअप्स, विद्यार्थी आणि उद्योग क्षेत्रात रुची असलेल्या नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. संतोष राणे (उपाध्यक्ष - कोकण) आणि सर्व कार्यकारिणी सदस्यांतर्फे करण्यात आले आहे.