LIVE UPDATES

तारांचा शॉक लागून तीन दुभत्या म्हशींचा मृत्यू

दोडामार्ग धाटवाडी येथील घटना : शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 03, 2026 12:48 PM
views 39  views

दोडामार्ग : शहरातील धाटवाडी-शिवकृपा नगर परिसरात तुटलेल्या विद्युतवाहिनीचा शॉक लागून तीन दुभत्या म्हशी दगावल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी घडली. या घटनेत कसई येथील शेतकरी शिवराम वसंत साळकर यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. 

दोडामार्ग-आयी मार्गावरील धाटवाडी येथील शिवकृपा नगर भागातील वीजवाहिन्या अनेक दिवसांपासून धोकादायक अवस्थेत आहेत. रविवारी एक विद्युतवाहिनी तुटून रस्त्यालगत पडली. विशेष म्हणजे तारा खाली पडूनही त्यामधील वीजपुरवठा खंडित करण्यात आला नव्हता.

दरम्यान, शेतकरी शिवराम साळकर यांनी आपल्या दुभत्या म्हशी चरण्यासाठी सोडल्या होत्या. चरणाऱ्या म्हशींचा तुटलेल्या विद्युतवाहिनीशी संपर्क येताच त्यांना तीव्र विद्युत धक्का बसला आणि तिन्ही म्हशींचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे साळकर यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. घटनेची माहिती मिळताच महावितरण विभागाला कळविण्यात आले. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. या प्रकरणाची नोंद दोडामार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू आहे.