LIVE UPDATES

महामार्गाच्या मोऱ्या अजूनही गाळाने भरलेल्या!

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 17, 2026 18:53 PM
views 20  views

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण शहराच्या हद्दीत पाणी साचू नये, यासाठी रस्त्यावर साचलेली माती काढण्याचे काम सुरू आहे. मात्र, मोठ्या मोऱ्या स्वच्छ करण्याच्या दृष्टीने कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने यावर्षीच्या पावसाळ्यात फटका बसण्याची शक्यता आहे.

शहरात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. पुलाच्या खाली सेवारस्त्यांचे कामही सुरू आहे. सेवारस्त्यांवर अनेक ठिकाणी माती साचल्यामुळे गेल्यावर्षी रस्त्यावर पाणी साचले होते. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला होता. सेवारस्त्यावर पाणी साचू नये, यासाठी काही ठिकाणी चेंबर्स बांधण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी खड्डे मारण्यात आले आहेत. या खड्ड्यातून पावसाचे पाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात जाते. मात्र, खड्यातच माती साचल्यानंतर पाणी रस्त्यावर तुंबत होते. प्रांताधिकारी कार्यालय परिसर, अयोध्या हॉटेल परिसर, शिवाजीनगर बसस्थानकाकडे जाण्याचा मार्ग, डीबीजे महाविद्यालय, पाग बौद्धवाडी, हॉटेल वैभव परिसर आणि विंध्यवासिनीकडे जाणाऱ्या मार्गावर पाणी साचत होते. यावर्षी पावसाळ्यापूर्वी महामार्ग विभागाने रस्त्यांची साफसफाई सुरू केली आहे. प्रामुख्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी महामार्ग विभागाचे कर्मचारी काम करत आहेत. मात्र, जागोजागी असलेल्या क्रॉस मोऱ्या साफसफाईकडे अजूनही गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. या मोऱ्या गाळांनी अर्ध्या भरल्या आहेत. या गाळामुळे पावसाळ्यात नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण शहराच्या हद्दीत अनेक ठिकाणी अतिक्रमणे आहेत. अनधिकृतपणे जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. सेवारस्त्यांवर वाहने पार्क केली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. मुसळधार पावसात रस्त्यावर पाणी साचले तर त्यातून मार्ग काढणे जिकिरीचे होते. त्यामुळे महामार्ग विभागाने अतिक्रमणांवर कारवाई करावी, अशीही मागणी आहे.