LIVE UPDATES

'आनंदाश्रय' वृद्धाश्रमात आरोग्य शिबिर संपन्न

कै. सिद्धेश गाळवणकर यांच्या तृतीय स्मृतिदिनाचे औचित्य
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 15, 2026 17:22 PM
views 45  views

कुडाळ : बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे संस्थापक सदस्य आणि संस्था व्यवस्थापक कै. सिद्धेश गाळवणकर यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त, बॅ. नाथ पै फिजिओथेरपी विभागातर्फे अणाव येथील 'जीवन संजीवनी सेवा ट्रस्ट' संचालित 'आनंदाश्रय' वृद्धाश्रमामध्ये विशेष आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

वृद्धांना फिजिओथेरपी उपचारांचे मार्गदर्शन

या शिबिरामध्ये बॅ. नाथ पै फिजिओथेरपी विभागाच्या २५ विद्यार्थ्यांनी प्रा. डॉ. वैष्णवी नाईक आणि प्रा. दीपाली वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली वृद्धांची आरोग्य तपासणी केली. यावेळी विद्यार्थ्यांना वृद्धांना विविध फिजिओथेरपी उपचार देण्यासोबतच, त्यांना योगासने आणि व्यायामाचे महत्त्व पटवून दिले. वृद्धापकाळात स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबतचे प्रात्यक्षिक मार्गदर्शनही यावेळी करण्यात आले.

संवेदनापूर्ण संवाद आणि स्नेहभोजन
शिबिराच्या निमित्ताने विद्यार्थी आणि शिक्षकांनी वृद्धांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत, त्यांच्यासोबत काही काळ व्यतीत केल्याने वृद्धाश्रमात अत्यंत आनंददायी वातावरण निर्माण झाले होते. याप्रसंगी संस्थेच्या सीईओ अमृता गाळवणकर यांनी स्वतः तयार केलेल्या खाद्यपदार्थांचे वाटप वृद्धांना करून त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या अनोख्या उपक्रमाबद्दल आश्रम व्यवस्थापक आणि वृद्धांनी विशेष समाधान व्यक्त केले.

संस्थेत श्रद्धांजली अर्पण
दुसरीकडे, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या आवारातही सिद्धेश गाळवणकर यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सिद्धेश गाळवणकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी प्रा. अरुण मर्गज, प्रा. परेश धावडे, चैताली बांदेकर, मंदार जोशी यांच्यासह विविध विभागांचे प्राध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.