
सावंतवाडी : आपण निरोगी आहोत असे वाटत असते. पण, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारखे आजार नकळत शरीरात बळावत असतात. त्यामुळे वय वाढल्यानंतर प्रत्येकाने नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदादीप चोडणकर यांनी केले. आरोग्य शिबीराच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
वैश्यवाडा येथील श्री हनुमान मंदिरात सुरु असलेल्या गणेशोत्सवानिमित्ताने श्री हनुमान मंदिर उत्सव समिती व राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री श्री गणेश आरोग्य अभियान अंतर्गत मोफत आरोग्य शिबीराचे वैश्यवाडा येथे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आयुर्वेद महाविद्यालयाचे नेत्रतज्ज्ञ डॉ. विशाल पाटील यांनी विकसीत भारत २०४७ हे मिशन गाठण्यासाठी प्रत्येकाने प्रथम निरोगी राहणे गरजेचे असल्याचे सांगितले. तर सभापती, नगरसेवक आनंद नेवगी यांनी सर्वांना निरोगी ठेवण्यासाठी असे उपक्रम आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. उत्सव समितीचे सचिव अण्णा म्हापसेकर यांनी प्रास्ताविकात वैश्यवाड्यातील विविध उपक्रमांचा आढावा घेतला.
दीप प्रज्वलनाने शिबीराला प्रारंभ करण्यात आला. यावेळी डॉ. नंदादीप चोडणकर, डॉ. पाटील, डॉ. सिद्धेश म्हापसेकर, डॉ. संकेत निर्मळ, डॉ. अमोल पल्हाळ, डॉ. निखिल यादव, डॉ. मुकुंद नाळे, डॉ. ऋतिक राज यांनी रुग्णांची तपासणी केली. परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी शिबीरासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी माजी नगरसेविका शुभांगी सुकी, सौ. गीता सुकी, आनंद आळवे, रूपेश कुडतरकर, राजेश पनवेलकर, मिलींद सुकी, महेश म्हापसेकर, दीपक म्हापसेकर, गजा कोदे, महादेव गावडे, यश जीवने, प्रथमेश सुकी, विनू सुकी, सौ. सोनटक्के, इक्बाल शेख, सौ. अंकिता बांदेकर, ऋतिक कोरगावकर, सौ. आशा मुंज, सौ.सायली मुंज, प्रसाद म्हापसेकर, मयुरेश परब आदी उपस्थित होते. संजय म्हापसेकर यांनी आभार मानले.










