LIVE UPDATES

कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल

५० खोल्यांचा ‘Tree of Life’ प्रकल्प ; २४ महिन्यांत उभारणीचे नियोजन, पर्यटनासह रोजगाराच्या नव्या संधी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 22, 2026 16:37 PM
views 64  views
#kokansadlive#news update#konkan update#

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन व धार्मिक स्थळ असलेल्या कुणकेश्वर येथे ‘Tree of Life’ या ताज हॉटेल्स ब्रँडच्या आलिशान हॉटेलची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पासंदर्भातील करार आज मंत्रालयातील दालनात करण्यात आला. या माध्यमातून सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्राला आणखी मोठी चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कुणकेश्वर येथे उभारण्यात येणाऱ्या या हॉटेलमध्ये ५० खोल्या असणार असून, हा प्रकल्प अवघ्या २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शिरोडा-वेळागरनंतर आता कुणकेश्वर येथे ताज हॉटेल साकारत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उच्च दर्जाच्या पर्यटन सुविधांमध्ये आणखी भर पडणार आहे.

या प्रकल्पामुळे देवगडसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनवाढीस मोठी मदत होण्याची अपेक्षा आहे. हॉटेल प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासोबतच स्थानिक व्यावसायिक, सेवा क्षेत्र आणि पर्यटनाशी संबंधित विविध व्यवसायांनाही चालना मिळणार आहे. परिणामी जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला आणि दरडोई उत्पन्नवाढीलाही हातभार लागण्याची शक्यता आहे.

कोकणच्या निसर्गसौंदर्याला जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधांची जोड देत सिंधुदुर्गला देश-विदेशातील पर्यटकांचे प्रमुख पर्यटन केंद्र बनविण्याच्या दिशेने हा प्रकल्प महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. कुणकेश्वरच्या धार्मिक महत्त्वासोबतच येथील समुद्रकिनारा आणि निसर्गसौंदर्याचा पर्यटनविकासासाठी अधिक प्रभावीपणे उपयोग होण्यास या प्रकल्पामुळे मदत होणार आहे.

या करारावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, ताज ग्रुपचे तन्वीर जाहीदी, दत्तात्रय हिरे आणि रोहन रानडे उपस्थित होते.