LIVE UPDATES

५७ कोटींच्या नळपाणी योजनेच्या तक्रारींची पालकमंत्र्यांकडून गंभीर दखल

• जिल्हाधिकाऱ्यांना गुणवत्ता तपासणीचे निर्देश
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 07, 2026 15:12 PM
views 40  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : सावंतवाडीतील ५७ कोटींच्या नळपाणी योजनेबाबत नागरिकांनी ठेकेदाराकडून झालेल्या भ्रष्टाचारासह या कमाच्या 'क्वालिटी ऑडिट'ची मागणी केल्यानंतर त्याची गंभीर दखल पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली. आज मंत्रालयात त्यांनी याबात आढावा बैठक घेतली. पुढील 8 महिन्यांत कामाचा दर्जाराखून योजन पूर्ण करण्याचे कडक आदेश त्यांनी दिलेत. तसेच जिल्हाधिकारी यांना कामाच्या गुणवत्तेच्या तपासणीसह जल अभियंत्यांच्या नियुक्तीचे निर्देश मंत्री नितेश राणेंनी दिलेत. 'कोकणसाद'ने याकडे लक्ष वेधताच पालकमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. 

नागरिकांचे भ्रष्टाचाराचे आरोप, क्वालिटी ऑडिटची मागणी याबाबत कोकणसादने मंत्री नितेश राणेंना सवाल केला होता. यावेळी दोन दिवसांत मंत्रालयात बैठक लावून ठेकेदाराकडून दर्जा न राखता काम झाल्यास सोडणार नाही असा इशारा दिला होता. त्यानंतर लगेचच आज याबाबत मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक झाली. अपूर्ण स्थितीत असलेल्या या प्रकल्पाला मुदतवाढ देण्यात आली असून पुढील 8 महिन्यांत दर्जाराखून  काम पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री श्री.राणे यांनी दिलेत. तसेच या कामामुळे सुरू असलेले खोदकाम, रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि त्यातून घडणारे अपघात ही गंभीरबाब असल्याने काम करताना नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची संबंधित यंत्रणांनी विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश कडक शब्दांत दिले. तसेच जिल्हाधिकारी यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन कामाची पाहणी करावी, कामाच्या गुणवत्तेची तपासणी करावी आणि प्रकल्प निर्धारित वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण होईल याची खात्री करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या. याशिवाय प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) मार्फत प्रभावी देखरेख ठेवून तातडीने आवश्यक जल अभियंत्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आलेत. उर्वरित काम विनाविलंब पूर्ण होऊन नागरिकांना लवकरात लवकर दिलासा द्यावा अशीही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.  दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.