
रत्नागिरी : पावसाचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणात यंदा पावसानेच दडी मारल्याने आता भूजलसाठ्यावरही त्याचे गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सप्टेंबरअखेर करण्यात आलेल्या भूजल सर्वेक्षणात ८६ निरीक्षण विहिरींच्या पाणीपातळीत सरासरी ५.२२ मीटरने घट झाल्याचे समोर आले आहे. राजापूर, संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यांत भूजलपातळी खालावल्याने आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळा संपताच विहिरींच्या पाण्याने तळ गाठण्याची चिन्हे दिसू लागल्याने शेती, बागायती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा सुमारे २८ टक्के कमी पाऊस झाल्याने जलस्रोतांवरील ताण वाढला आहे. राज्य शासनाने पावसाच्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून, रत्नागिरी जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा त्यात समावेश आहे. यापूर्वी ‘ट्रिगर-१’मध्ये रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर या तालुकांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर ‘ट्रिगर-२’मध्ये लांजा, मंडणगड आणि खेड या तालुकांचाही समावेश झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीस्थितीचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या निरीक्षणानुसार, राजापूर तालुक्यात भूजलपातळी तब्बल ५.८ मीटरने खाली गेली आहे. संगमेश्वर तालुक्यात ५.२ मीटरने, तर रत्नागिरी तालुक्यातही चार मीटरपेक्षा अधिक घट नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यातील ८६ निरीक्षण विहिरींच्या सर्वेक्षणातून समोर आलेली ही आकडेवारी आगामी काळातील पाणीटंचाईची पूर्वसूचना मानली जात आहे.
पावसाचे प्रमाण घटल्याने जमिनीत पुरेशा प्रमाणात पाणी मुरलेले नाही. परिणामी, विहिरी आणि अन्य भूजलस्रोतांची पाणीपातळी अपेक्षित प्रमाणात वाढलेली नाही. त्यातच दैनंदिन वापर, शेती आणि बागायतीसाठी होणारा पाण्याचा उपसा सुरू राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील लघुपाटबंधारे प्रकल्पांमध्ये सध्या ७६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच कालावधीत हा साठा ९४ टक्के होता. यंदा जलसाठ्यात झालेली घट आणि भूजलपातळीतील घसरण यामुळे आगामी रब्बी हंगामासाठी पाण्याचे नियोजन करण्याचे आव्हान उभे राहिले आहे
ताजी बातमी
View all










