LIVE UPDATES

८ ऑगस्ट रोजी सावंतवाडीमध्ये भव्य मॅरेथॉन स्पर्धा

नगरपरिषद आणि 'सिंधू रनर्स, सावंतवाडी' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 03, 2026 20:44 PM
views 25  views

सावंतवाडी : नगरपरिषद आणि 'सिंधू रनर्स, सावंतवाडी' यांच्या संयुक्त विद्यमाने 'माझी वसुंधरा अभियान' व 'स्वच्छ सर्वेक्षण' अंतर्गत सावंतवाडीमध्ये भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. ८ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता सुरू होऊन दि. ९ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत प्रसिद्ध मोती तलाव परिसरात रंगणार आहे. या क्रीडा सोहळ्याचा शुभारंभ ८ ऑगस्टला रात्री ८ वाजता राजवाडा प्रवेशद्वारावरून होणार आहे.

या स्पर्धेत ३ तास, ६ तास आणि १२ तास अशा तीन मुख्य गटांमध्ये सामने रंगणार असून यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह गोवा आणि इतर राज्यांतील अनेक नामांकित धावपटू सहभागी होणार आहेत. गेल्या काही वर्षांत सिंधू रनर्सने 'सावंतवाडी १२ तास रन', 'शिवज्योत रन', 'गोवा-सावंतवाडी १०० कि.मी. इंटरसिटी रन' आणि 'सिंधू यंग चॅम्पियन्स किड्स रन' यांसारखे उपक्रम यशस्वीपणे राबवून सिंधुदुर्गात धावण्याची एक मोठी चळवळ निर्माण केली आहे. यातूनच प्रेरणा घेऊन स्थानिक धावपटूंनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. आता 'सावंतवाडी १२ तास रन' ही महाराष्ट्रातील अल्ट्रा धावपटूंसाठी एक प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जात असून सिंधुदुर्गातील वाढत्या फिटनेस संस्कृतीची आणि अल्ट्रा रनिंगवरील विश्वासाची ती साक्ष ठरत आहे.

केवळ विजेते तयार करणे हा या स्पर्धेचा उद्देश नसून धावणे ही रोजच्या आरोग्यदायी जीवनशैलीचा भाग बनवणे, तरुणांमध्ये फिटनेसबाबत जनजागृती करणे, शुद्ध हवेसाठी पर्यावरणाचे संतुलन राखणे तसेच जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे धावपटू घडवणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.सावंतवाडी '१२ तास रन' हा आता केवळ क्रीडा प्रकार न राहता सिंधुदुर्गच्या जिद्दीचा आणि सामाजिक सहभागाचा एक प्रेरणादायी उत्सव बनला आहे. रात्रभर धावणाऱ्या या सर्व धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि या अनोख्या क्रीडा सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा लखमराजे सावंत भोसले आणि 'सिंधू रनर्स, सावंतवाडी' यांच्या वतीने करण्यात आले आहे.