नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त 10 एप्रिलला भव्य सोहळा

CM देवेंद्र फडणवीस, DCM एकनाथ शिंदे यांची उपस्थिती
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: April 08, 2026 16:00 PM
views 254  views

  • अभिनेते संजय दत्तसह सोनू निगम यांची 'लाईव्ह कॉन्सर्ट'


  • भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली माहिती 

कणकवली : आमचे नेते तथा खासदार नारायण राणे यांचा ७४ वा वाढदिवस १० एप्रिलला होत असून यानिमित्त पुढील वाढदिवसापर्यंत अमृत महोत्सवी पदार्पण वर्ष साजरा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. तर वाढदिवसानिमित्त १० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक मंत्री, आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली. वाढदिवसाला प्रसिद्ध सिनेअभिनेते संजय दत्त उपस्थित राहणार असून सोहळ्यानंतर प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम यांची 'लाईव्ह कॉन्सर्ट' कोकणवासीयांना बघायला मिळणार असल्याचे देखील सावंत यांनी सांगितले.


प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. सावंत बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, कणकवली सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनू सावंत, भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जि. प. सदस्य मनोज रावराणे, भाजप कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री आदी उपस्थित होते. 

अमृत महोत्सवी पदार्पण वर्ष राबवणार 

प्रभाकर सावंत म्हणाले, कोकणात विशेषतः जिल्ह्यात जे सण उत्सव साजरे केले जातात त्याचप्रमाणे नारायण राणे यांचा वाढदिवस देखील साजरा केला जातो. कारण, नारायण राणे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. त्यांचा ७४ वा वाढदिवस यावेळी होत असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. म्हणूनच आम्ही अमृत महोत्सवी पदार्पण सोहळा यावर्षी राबवत आहोत. त्यानिमित्त वर्षभर विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. दर महिन्याच्या १० तारीखच्या दरम्यान हे उपक्रम संबंध रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात राबविले जाणार आहेत. यामध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते ,राणे यांचे हितचिंतक आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील सर्व नागरिकही सहभागी होतील असे सावंत म्हणाले.

पुष्पगुच्छ नको, पुस्तके द्या

राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १० एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता उपजिल्हा रुग्णालय समोरील मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने आम्ही आवाहन करतो की, नारायण राणे यांना पुष्पगुच्छ भेट देण्यापेक्षा पुस्तक भेट द्या. ही पुस्तकांची भेट सोहळ्याच्या प्रवेशद्वारावरच स्वीकारण्याची व्यवस्था केली जाणार आहे. हजारो पुस्तके या निमित्ताने संकलीत होतील. ही पुस्तके विविध ग्रंथालयांना देण्यात येणार आहे. कोकणातील वाचन चळवळ वृद्धिंगत व्हावी हा यामागचा उद्देश आहे, असेही सावंत म्हणाले.

विशेष आसन व्यवस्था 

नारायण राणे कोणत्याही एका पक्षापुरते मर्यादित असणारे नेते नाहीत. राणे यांनी चार दशके कोकणाची सेवा केली आहे. सहाजिकच त्यांच्या वाढदिवसाला सर्वपक्षीय मंडळी उपस्थित असतात त्यामुळे विशेष निमंत्रण देण्याची व्यवस्था आम्ही करणार आहोत. या विशेष निमंत्रितांना आसन व्यवस्था देखील केली जाणार असल्याचे सावंत म्हणाले.

संजय दत्त, सोनू निगमची उपस्थिती

या सोहळ्यास प्रसिद्ध सिनेअभिनेते संजय दत्त हे देखील उपस्थित राहणार आहेत. तर सोहळ्यानंतर प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम यांची लाईव्ह कॉन्सर्ट देखील कोकणवासीयांना अनुभवायला मिळणार असल्याची माहिती प्रभाकर सावंत यांनी दिली.