
कुडाळ : वाचनसंस्कृतीचा वारसा अधिक समृद्ध करण्यासाठी आणि बालवयापासूनच मुलांमध्ये पुस्तकांची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने कुडाळ शहरात ‘वाचनवाट ग्रंथालया’तर्फे भव्य पुस्तक प्रदर्शन व विक्री सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दिनांक १६, १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी पार पडणार असून ग्रंथप्रेमींसाठी ही एक उत्तम पर्वणी ठरणार आहे.
हे तीन दिवसीय पुस्तक प्रदर्शन कुडाळ हायस्कूलजवळील ‘मराठा समाज हॉल’ येथे आयोजित करण्यात आले असून, दररोज सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत सर्व नागरिक, विद्यार्थी आणि वाचनप्रेमींसाठी खुले राहील. केवळ पुस्तक विक्रीपुरते मर्यादित न राहता, या प्रदर्शनात साहित्यरसिकांसाठी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे.
मुलांसाठी कथाकथन: बालमनाला आकर्षित करणाऱ्या आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणाऱ्या गोष्टींचे खास कथाकथन सत्रांचे आयोजन. सर्जनशील लेखन व चित्रकथा: मुलांमधील सुप्त कलागुणांना आणि लेखनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी खास कार्यशाळा व मार्गदर्शन. भेटा आणि संवाद साधा: साहित्यप्रेमींना विविध लेखक, विचारवंत आणि दिग्गजांशी थेट संवाद साधण्याची संधी. उत्तम पुस्तकांची ओळख करून देणे तसेच निवडक साहित्यकृतींचे अभिवाचन सत्र.
वाचनसंस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आणि नवी पिढी पुस्तकांशी जोडली जावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी कुडाळ शहर व परिसरातील सर्व वाचनप्रेमी, पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला बहुसंख्येने भेट देऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे नम्र आवाहन आयोजकांनी केले आहे.
प्रदर्शनाबाबत अधिक माहितीसाठी किंवा नावनोंदणीसाठी आयोजक मुग्धा शेवाळकर यांच्याशी ७३९७४६९३९० (7397469390) या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
ताजी बातमी
View all












