
दोडामार्ग : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सन 2025-26 अंतर्गत नेमून दिलेले घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करून दोडामार्ग तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावण्याची उल्लेखनीय कामगिरी ग्रामपंचायत घोटगेवाडीने केली आहे. या दमदार कामगिरीबद्दल पंचायत समिती दोडामार्गच्या वतीने ग्रामपंचायतीला प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
1 जुलै 2026 रोजी कृषी दिन आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री हरीत क्रांतीचे प्रणेते कै.मा.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात दोडामार्ग सभापती पार्वती म. गवस, उपसभापती गणेशप्रसाद गवस, गट विकास अधिकारी अजिंक्य द. सावंत व सहाय्यक गट विकास अधिकारी यशवंत भि. गवस यांच्या हस्ते सरपंच श्रीनिवास शेटकर व उपसरपंच सागर कर्पे ग्रा.पं. अधिकारी सुजय थेटे,ग्रा.पं.कर्मचारी नितीन केसरकर, रोजगार सेवक श्री.नितीन पांगम यांनी हा सन्मान स्वीकारला. सरपंच श्रीनिवास शेटकर म्हणाले, _"ग्रामसेवक, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रा.प.कर्मचारी, रोजगार सेवक व लाभार्थ्यांच्या टिमवर्कमुळे आम्ही दिलेले टार्गेट मुदतीत पूर्ण केले. केंद्र व राज्य शासनाच्या योजना पारदर्शकपणे व गतीने राबवून प्रत्येक गरजू, बेघर कुटुंबाला हक्काचे पक्के घर मिळवून देणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.
कृषी दिनी मिळालेला हा सन्मान सरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक व गावकऱ्यांच्या एकजुटीने केलेल्या मेहनतीचे फळ आहे. घोटगेवाडी गावासाठी दोडामार्ग तालुक्यातून सर्वाधिक घरकुलं मंजूर झालेली होती आणि घरकुल पुर्ण करण्यातही घोटगेवाडी गांव प्रथम क्रमांकावर राहीलेला आहे याचा आनंद आहे काम बोलतं' हेच आमचं ब्रीदवाक्य आहे आणि ते आम्ही कृतीतून सिद्ध केले आहे,"असे मत उपसरपंच सागर कर्पे* यांनी व्यक्त केले.या शेतकरी मेळाव्याला दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी बांधव, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी सहाय्यक,महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.













