‘दशावतार’चा सहा देशांनी केला ‘गौरव' !

सावंतवाडीतील दशावतार कलावंत गौरव शिर्के यांचा सन्‍मान
Edited by: प्रसाद कदम
Published on: December 05, 2025 16:10 PM
views 262  views

‘वर्ल्ड एक्‍सलन्‍स बुक रेकॉर्ड’मध्ये नोंद


सिंधुदुर्ग : कोकणच्‍या मातीतून उमललेला 'दशावतार' कलेचा मयूरपंख आज जागतिक क्षितिजावर दिमाखाने नाचत आहे. महाराष्ट्राच्या रंगभूमीचा हा सांस्कृतिक ठेवा, सहा देशांच्या गौरवाचा तिलक माथी मिरवून ‘वर्ल्ड एक्‍सलन्‍स बुक रेकॉर्ड’मध्ये सुवर्णाक्षरी कोरला गेला. कला आणि भक्ती यांचा दिव्य संगम असलेली ही लोककला, आता विश्व-वंदनीय होऊन भारतभूमीची शान वाढवत आहे. या तेजोमय परंपरेचे पाईक, राजपुत्र आणि नारदाची भूमिका साकारणारे सिद्धहस्त कलावंत गौरव शिर्के, हे त्या गौरवाचे मानकरी ठरले. 

गौरव शिर्के यांच्‍या अभिनयातून जणू पौराणिक पात्रे सजीव होतात आणि रंगमंच हा वैकुंठाचा दरबार भासू लागतो. गौरव शिर्के यांच्या कलासाधनेला मिळालेला हा सन्मान, कोकणी मातीतील कलेच्या प्रत्येक कणांचा गौरव आहे. हे यश म्हणजे, पारंपरिक कलेच्या ज्योतीला आधुनिक जगात मिळालेली नवी आणि देदीप्यमान ओळख होय. ‘दशावतार’ हा केवळ एक नाट्यप्रयोग नाही, तर तो महाराष्ट्राच्या आत्म्याचा आणि अस्मितेचा प्रतिध्वनी आहे. त्यांच्या अलौकिक सादरीकरणाने सातासमुद्रापार रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवून कलेची मोहोर उमटवली आहे.. या कलावंताच्या कर्तृत्वाने सिद्ध केले की, प्रामाणिक कलाकृती आणि कलावंतांची तपश्चर्या नेहमीच वैश्विक कीर्तीचे गगनचुंबी शिखर गाठते.

सहा देशांनी या लोककलावंताच्‍या पुरस्‍कारासाठी दशावतारातील कलाकाराची निवड केली आहे. त्‍यात गौरव शिर्के यांचा सन्‍मान करण्‍यात आला आहे. शिर्के हे सावंतवाडी, गोठण भागातील असून गेली १७ वर्षे ते या कलेच्‍या प्रांगणात आहेत. आतापर्यंत त्‍यांनी १६ जिल्‍हास्‍तरीय तर १९ राज्‍यस्‍तरीय पारितोषिके प्राप्‍त केली आहेत. राजकुमार आणि नारद या भूमिका त्‍यांनी गाजविल्‍या आहेत. जगभरातून लोककलेचा गौरव करण्‍यासाठी प्रस्‍ताव मागविण्‍यात आले होते. भारतातून महाराष्‍ट्राच्‍या कोकणात रुजलेल्‍या दशावतार लोककलेची निवड करून शिर्के यांची त्‍यासाठी निवड करण्‍यात आली. गौरव शिर्के हे सध्‍या आरोस, दांडेली येथील जय हनुमान नाट्य मंडळात कार्यरत आहेत. यापूर्वी त्‍यांनी  स्‍वत:ची महापुरूष दशावतार कंपनी सुद्दा चालविली आहे. आतापर्यंत त्‍यांनी अनेक स्‍पर्धांत सहभाग घेऊन उज्‍ज्‍वल यश संपादन केले आहे. दरम्‍यान गौरव यांचा खर्‍या अर्थाने जगाने गौरव केल्‍यामुळे सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातून त्‍यांच्‍यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.