
देवगड : शहरातील फ्रेंडस् सर्कल, देवगड सडा यांच्यावतीने फ्रेंडस् सर्कल नाका येथे दहिहंडी उत्सव २०२६ अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धेत मुलांच्या गटात निहार कोळी याने 'बेस्ट कृष्णा', तर मुलींच्या गटात पुण्यश्री पवार हिने 'बेस्ट राधा'चा किताब मिळवित प्रथम क्रमांक पटकाविला. दोन्ही विजेत्यांना प्रत्येकी दोन हजार रूपये व आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दहिहंडी उत्सवाचा शुभारंभ नगरसेवक नितीन बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धा सुरू करण्यात आली. ५ ते १२ वर्षे वयोगटात बेस्ट कृष्णा व बेस्ट राधा अशा प्रकारात ही स्पर्धा खेळविण्यात आली. या स्पर्धेत दोन्ही गटात मिळून १३ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेत सहभागी मुलांनी राधा-कृष्णाच्या केलेल्या आकर्षक वेशभूषांनी उपस्थित रसिकांची मने जिंकली.
छोट्या स्पर्धकाच्या प्रत्येक एन्ट्रीला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात भरभरून दाद दिली. या स्पर्धेत मुलांच्या गटात द्वितीय क्रमांक दीप पवार याने, तृतीय क्रमांक रोशन सावंत याने पटकाविला. तर मुलींच्या गटात द्वितीय क्रमांका आराध्या जाधव हिने, तर तृतीय क्रमांक कविता उमराणी हिने मिळविला. स्पर्धेचे परीक्षक सुहास जोशी यांनी केले.
दोन्ही गटातील द्वितीय क्रमांकप्राप्त विजेत्याला रोख १ हजार रूपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकप्राप्त विजेत्याला रोख ५०० रूपये व सन्मानचिन्ह असे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरणप्रसंगी व्यासपीठावर नगरसेवक नितीन बांदेकर, न. पं. चे आरोग्य व स्वच्छता सभापती निवृत्ती उर्फ बुवा तारी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सावंत, नगरसेवक संतोष तारी, संजय बांदेकर, शेखर सावंत, प्रदीप सावंत, प्रवीण नळेकर आदी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फ्रेंडस् सर्कलच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. दहिहंडी उत्सवात निमंत्रित गोविंदा पथकांनी चित्तथरारक मानवी मनोरे रचत उत्सवात रंगत आणली. या उत्सवानिमित्त आयोजित लकी ड्रॉ उपक्रमालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.











