LIVE UPDATES

kankavli news : सा.बां. कार्यकारी अभियंत्‍यांचे ठेकेदाराशी संगनमत

माजी आमदार वैभव नाईकांचा आरोप : सा. बां. कार्यालय गाठत विचारला जाब
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 04, 2026 20:18 PM
views 68  views

कणकवली : तालुक्यातील शिरवल - शिवडाव - दारीस्ते रस्त्यावर लहान पुलाचे बांधकामासाठी एका ठेकेदाराने १७ टक्‍के दराने निविदा भरली असतानाही त्‍याच्‍या निवीदेत चुक काढून दोन टक्‍के कमी दराने दिविदा भरलेल्‍या ठेकेदाराला काम देण्‍यात आल्‍याबाबत माजी आमदार वैभव नाईक यांनी येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालय गाठत कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांना जाब विचारला. बागुल यांनी ठेकेदाराशी संगनमत केल्‍याचा आरोपही नाईक यांनी केला

नाईक यांच्‍या नेतृत्‍वाखाली उबाठा शिवसेनेच्‍या शिष्‍टमंडळाने शुक्रवारी सा. बां. कार्यालय गाठले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख राजू राठोड, नगरसेवक संकेत नाईक, विलास गुडेकर, महेश देसाई, रोहित राणे, हळवल माजी सरपंच दीपक गुरव, रवी सावंत, शिरीष घाडीगावकर आदी उपस्थित होते.  

वैभव नाईक म्‍हणाले, शिरवल - शिवडाव - दारीस्ते रस्‍त्‍यासाठी ६९ लाख ४२ हजार रु. मंजूर झाले आहेत. याकामाची निविदा एका ठेकेदाराने १७ टक्के कमी दराने भरली असताना त्या ठेकेदाराच्या निविदेत त्रुटी काढून २ टक्के कमी दराने निविदा भरलेल्या ठेकेदाराला हे काम मंजूर करण्यात आले. त्याचबरोबर निविदा प्रक्रिया ३० दिवसांच्या आत पूर्ण करण्याबाबतचा शासन निर्णय असताना तब्बल ६ महिने उशिराने हि निविदा उघडण्यात आली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांनी ठेकेदाराशी संगनमत करून हे काम मॅनेज केले आहे हे दिसून येते.

सा.बां. विभाग सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे कुराण बनले आहे. गेल्या दोन वर्षांत सार्वजनिक बांधकाम विभागात एकही काम स्पर्धात्मक पद्धतीने झालेले नसून सार्वजनिक बांधकाम विभागाचा 'आका' कोण? असा सवाल नाईक यांनी केला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात पारदर्शकता आली नाही तर न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला.  

यावेळी उबाठाच्‍या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंत्यांवर अनेक प्रश्नांचा भडीमार केला. शिरवल - शिवडाव - दारीस्ते रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करण्याच्या कामातील १७ टक्के कमी दराची निविदा डावलून २ टक्के कमी दराने निविदा भरलेल्या ठेकेदाराला हे काम कसे काय देण्यात आले? त्यामुळे शासनाचे ११ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच निविदा वेळेत उघडली असती तर २०२६ च्या पावसाळ्या आधी हे काम पूर्ण होणार होते. या कामाची निविदा नोटीस १७ मार्च रोजी प्रसिद्ध झाली होती. सदर निविदा उघडण्याची तारीख २५ मार्च होती. पण, निविदा १९ सप्‍टेंबरला उघडण्यात आली.

निविदा प्रक्रिया ३० दिवसांच्या आत पूर्ण करण्याबाबतचा शासन निर्णय असताना हि निविदा उघडण्यास ६ महिने का लागले? त्याचबरोबर ५ पेक्षा जास्त ठेकेदारांनी निविदा भरली असेल तर त्या सर्व ठेकेदारांच्या उपस्थितीत निविदा उघडावी असा शासनाचा नियम आहे. या कामाची १० ठेकेदारांनी निविदा भरली असताना त्यांच्या समक्ष निविदा का उघडण्यात आली नाही? असे सवाल पदाधिकार्‍यांनी केले.

शासनाच्या सर्व नियमांना कणकवली कार्यकारी अभियंता हरताळ फासत आहेत. जुन्या कार्यकारी अभियंत्यांचे ऐकून तुम्ही हे करत आहात का? असे सवाल करत वैभव नाईक व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरले. 

यावेळी कार्यकारी अभियंता यांनी सरकार कडून निधी मिळत नाही असे सांगितले. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती सरकार कडून निधी दिला जात नाही यावर शिक्कामोर्तब झाल्याचे वैभव नाईक म्‍हणाले. 

शिरवल - शिवडाव - दारीस्ते रस्त्यावरील पुल बांधकामाच्या निविदा प्रकियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याने या कामाची फेर निविदा काढण्यात यावी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात पारदर्शकता ठेवावी अशी सूचना नाईक यांनी केली. त्याचबरोबर मठ - कुडाळ - पणदूर - घोडगे या रस्त्याच्या कामाची निविदा देखील एकाच ठेकेदाराने भरली ती देखील १ ते २ टक्के कमी दराने आहे आणि त्या ठेकेदाराला ती निविदा मंजूर करण्यात आली आहे. त्यातही भ्रष्टाचार झाला आहे.

कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग ते रेल्वेस्टेशन जाणारा रस्ता विनय राणे या ठेकेदाराने अर्धवट टाकला आहे. त्याविरोधात सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले आणि त्याच ठेकेदाराला पुन्हा ओरोस येथील धर्मादाय आयुक्त इमारतीचे ५ कोटीचे काम देण्यात आले आहे. त्यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाचा अनागोंदी कारभार सुरु असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला.  

ग्रामीण भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, काही रस्त्यांच्या दुतर्फा झाडी वाढल्याने अपघात होत आहेत. रस्त्यावर वृक्षलागवडीच्या कामातही भ्रष्टाचार झाला आहे. ठेकेदारांनी लावलेली झाडे मरून गेली असल्याचे वैभव नाईक व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.