कोलझर इथं उद्या शेतकरी-बागायतदार मेळावा

नारळ-सुपारी उत्पादकांसाठी नवीन तंत्रज्ञान व रोगनियंत्रण उपायांवर मार्गदर्शन
Edited by:
Published on: December 05, 2025 16:28 PM
views 56  views

दोडामार्ग : जिल्ह्यातील प्रमुख बागायती पिकांपैकी नारळ आणि सुपारी पिकांवर बदलत्या हवामानाचा वाढता परिणाम पाहता शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन मिळावे, उत्पादन खर्च कमी व्हावा व उत्पन्नवाढ साधता यावी यासाठी विविध कार्यकारी सेवा सोसायटी, कोलझरतर्फे उद्या (ता. ६) शेतकरी-बागायतदार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्याचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. मनिष दळवी यांच्या हस्ते होणार आहे. मेळाव्यास प्रमुख वक्ते म्हणून मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय दळवी, तसेच बागायती क्षेत्रातील अनुभवी तज्ञ डॉ. एम. एस. शेडगे, डॉ. आर. आर. राठोड आणि डॉ. वाय. सी. मुठाळ मार्गदर्शन करणार आहेत.

मेळाव्यात नारळ-सुपारी बागांचे व्यवस्थापन,  हवामान बदलाचा परिणाम व उपाययोजना, रोग व कीड नियंत्रणासाठी नवकल्पना, उत्पादनक्षमता आणि गुणवत्तावाढीसाठी शास्त्रीय पद्धती, बाजारपेठेतील बदल व शेतकऱ्यांना लाभदायी धोरणे यां महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.

मेळाव्यादरम्यान सहकार क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल जिल्हा बँकेचे अध्यक्ष  मनिष दळवी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच ‘उत्कृष्ट शास्त्रज्ञ पुरस्कार’ प्राप्त केल्याबद्दल डॉ. विजय दळवी यांचा विशेष गौरव होणार आहे.

हा मेळावा उद्या दुपारी २.३० वा. येथील प्राथमिक शाळेच्या पटांगणात होणार असून मोठ्या संख्येने शेतकरी-बागायतदारांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सोसायटीचे अध्यक्ष व संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.