LIVE UPDATES

रानभाज्यांच्या माध्यमातून आरोग्याचा खजिना आपल्या दारी : विलास नावळे

लोरे मांजलकरवाडी शाळेत रानभाज्यांचे प्रदर्शन ; रोटरी क्लब ऑफ कणकवलीचा उपक्रम
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 11, 2026 14:24 PM
views 33  views
#kokansadlive#news update#konkan update#

वैभववाडी : रानभाज्यांच्या माध्यमातून आरोग्याचा खजिना आपल्या दारी आला आहे. अशा उपक्रमांमुळे महिलांच्या कलागुणांना वाव मिळतो. त्यामुळे गावागावांत अशा स्पर्धांचे सातत्याने आयोजन झाले पाहिजे, असे प्रतिपादन लोरे नं २ सरपंच विलास नावळे यांनी केले.

लोरे मांजलकरवाडी येथील शाळेत रोटरी क्लब ऑफ कणकवली यांच्यावतीने रानभाज्यांचे प्रदर्शन व आयुर्वेदिक पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यावेळी श्री नावळे बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर केंद्र प्रमुख राजेंद्र यादव, रोटरी अध्यक्ष राजश्री रावराणे, मेघा गांगण, तृप्ती कांबळे, लीना काळसेकर, श्रीमती मुसळे यांच्यासह शाळेतील शिक्षक, मृणाल कदम, अंगणवाडी सेविका जान्वी नराम, मदतनीस श्रीमती आग्रे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्ताराम कदम आदी उपस्थित होते . 

 श्री नावळे पुढे म्हणाले, रानभाज्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत.अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रानभाज्यांच महत्त्व समजेल.त्यामुळे शाळांमध्ये असे उपक्रम होणं आवश्यक आहे.तसेच पाककला स्पर्धेमुळे महीलांना व्यासपीठ उपलब्ध झाले.याबद्दल त्यांनी आयोजकांच कौतुक केले.

 पाककला स्पर्धेत गावातील २० महिलांनी सहभाग घेतला. पावसाळ्यात नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणाऱ्या विविध रानभाज्यांपासून महिलांनी चवदार व पौष्टिक पदार्थ तयार केले.
यावेळी रोटरियन मेघा गांगण यांनी रानभाज्यांचे आहारातील महत्त्व, आरोग्यदायी गुणधर्म तसेच मुलांच्या आहारात पारंपरिक व पौष्टिक पदार्थांचा समावेश करण्याबाबत मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख राजेंद्र यादव यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

पाककला स्पर्धेत दर्पण बोबकर यांनी प्रथम, मनस्वी गोसावी यांनी द्वितीय, तर सानवी तर्फे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. अश्विनी मांडवकर व गौरी मांजलकर यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. सर्व विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
स्पर्धेचे परीक्षण लीना काळसेकर यांनी केले.