
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत 'उद्योजक विचार मंच' स्थापन करून गावागावातील उद्योगक्षमतेला दिशा देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम जिल्हा परिषद हाती घेणार आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येणार असून, १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत उद्योजक विचार मंच स्थापन करण्याचा विषय अजेंड्यावर ठेवून चर्चा केली जाणार आहे. प्रत्येक गावातून वर्षाला किमान एक उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी दिली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत गावातील उपलब्ध संसाधने, कौशल्य, मनुष्यबळ आणि स्थानिक उत्पादनांचे 'रिसोर्स मॅपिंग' केले जाणार आहे. त्याआधारे उद्योगांच्या नव्या संधी शोधून उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांची नोंदणी केली जाणार असून त्यांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी नियमित पाठपुरावा करण्यात येणार आहे. यासाठी पंधरा दिवसांतून एकदा उद्योजक विचार मंचाची बैठक घेण्यात येणार आहे.
या उपक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या दालनात बैठक पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अभिजित पिसाळ, सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष डॉ. संतोष राणे, विशाल कामत, श्रीकृष्ण परब, नकुल पार्सेकर, 'गाव तिथे उद्योजक' अभियानाचे राज्य प्रमुख रामेश्वर पवार आणि दोडामार्गचे प्रमुख बाबा टोपले उपस्थित होते.
ग्रामपंचायत स्तरावर सात सदस्यांची उद्योजक विचार मंच समिती स्थापन केली जाणार आहे. सरपंच, ग्रामसेवक, स्थानिक यशस्वी उद्योजक, शिक्षक, डॉक्टर आणि १५ ते २९ वयोगटातील युवक-युवतींचा या समितीत समावेश असेल. गावातील उद्योगक्षम क्षेत्रे, उपलब्ध संसाधने, बाजारपेठ, कर्ज आणि शासकीय योजनांची गरज याचा अभ्यास करून त्यानुसार नियोजन केले जाणार आहे. तालुका स्तरावर ११ सदस्यांची समिती कार्यरत राहणार असून त्यामध्ये गटविकास अधिकारी, लीड बँक व्यवस्थापक, कृषी अधिकारी, पशुधन विकास विभागाचे अधिकारी, उद्योजक आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रतिनिधी सहभागी राहतील. तर जिल्हास्तरावर सुमारे ३० सदस्यांचे समन्वय मंडळ तयार करून शासन, बँका, उद्योजक आणि तज्ज्ञ यांच्यात समन्वय साधला जाणार आहे.
याशिवाय गावातील काजू प्रक्रिया, खाद्यप्रक्रिया, शेतीपूरक व्यवसाय आणि अन्य लघुउद्योगांना क्लस्टरच्या माध्यमातून एकत्र आणून उत्पादन, प्रक्रिया, ब्रँडिंग आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ उद्योगांना मिळवून देण्यासाठीही विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. "गावातील तरुणांना रोजगारासाठी शहरांकडे जाण्याची गरज भासू नये, गावातच उद्योग उभे राहावेत आणि स्थानिक अर्थव्यवस्था सक्षम व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ग्रामपंचायतीपासून जिल्हास्तरापर्यंत सर्व यंत्रणा एकत्र आणून 'गाव तिथे उद्योजक' ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी हा महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे," असे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी सांगितले.












