
सावंतवाडी : माडखोल गावातील वीजपुरवठ्याशी संबंधित समस्या तातडीने सोडवून गणेशोत्सवाच्या काळात विद्युत पुरवठा सुरळीत व अधिक क्षमतेने उपलब्ध करून दिल्याबद्दल महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता शैलेंद्र राक्षे यांचा माडखोल ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच राजन राऊळ, उपसरपंच दत्ताराम कोळमेकर, शिवसेना ओबीसी सेलचे तालुका प्रमुख वासुदेव होडावडेकर, माजी उपसरपंच सुरेश आडेलकर, सोसायटी संचालक प्रकाश नाईक, लखन आडेलकर, जीवन केसरकर, निलेश लातये, प्रभाकर गावडे, भरत राऊळ, भास्कर परब यांच्यासह माडखोल ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांच्या समस्यांची तातडीने दखल घेऊन तत्परतेने कार्यवाही केल्याबद्दल श्री. राक्षे यांचे माडखोल ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.
31 ऑगस्ट 2026 रोजी माडखोल ग्रामस्थांनी सावंतवाडी येथील महावितरण कार्यालयात जाऊन शैलेंद्र राक्षे यांची भेट घेतली होती. यावेळी सापळे स्टॉप येथील बंद असलेला विद्युत ट्रान्सफॉर्मर तसेच बामणादेवी येथील बंद ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलण्याची मागणी करण्यात आली होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावातील विद्युत भार वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन या मागणीची तातडीने दखल घेत श्री. राक्षे यांनी अवघ्या दोन दिवसांत नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची कार्यवाही केली.
त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माडखोल ग्रामस्थांच्या वतीने सावंतवाडी येथील महावितरण कार्यालयात श्री. राक्षे यांचा सत्कार करण्यात आला. माजी सरपंच राजन विष्णू राऊळ यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच दत्ताराम कोळमेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. राक्षे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.










