
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात ऊसाची उत्पादकता वाढविण्यासाठी व अडचणी सोडविण्यासाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाचे अधिकारी, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ् व जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांची बैठक पार पडली. जिल्ह्यात सध्या सुमारे 1 हजार 355 हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड असून ऊसतोड टोळ्या उशिरा उपलब्ध होऊन वेळेत ऊस तोड न होणे, अवेळी लागवड यामुळे ऊस उत्पादनात घट होत असल्याचे शेतकरी शास्त्रज्ञ आणि अधिकारी यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले.
ऊसतोडणीतील अडचणी दूर करून शेतकऱ्यांना वेळेत तोडणीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊसतोडणीसाठी आवश्यक सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यावर साखर कारखान्यांच्या संचालकांसोबत स्वतंत्र बैठक घेऊन ऊसतोडणीच्या प्रश्नावर समन्वयातून तोडगा काढण्यात येईल, असे पालकमंत्री यांनी बैठकीत आश्वासित केले. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश सावंत, ऊस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.विजयकुमार शेटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित वाण, योग्य लागवड पद्धती याबाबत मार्गदर्शन करावे अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. प्रायोगिक तत्त्वावर प्रगतिशील शेतकऱ्यांची निवड करून त्यांच्या माध्यमातून ऊस उत्पादकता वाढी साठी प्रायोगिक तत्वावर कार्यक्रम राबवावा, अशी सूचना जिल्हाधिकारी यांनी केली.
यासह नापणे येथील ऊस संशोधन केंद्राला आवश्यक मनुष्यबळ उपलब्धता आणि केंद्राच्या बळकटीकरणाची मागणीही यावेळी करण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ऊस उत्पादकता वाढीसाठी शेतकरी, साखर कारखाने, कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग यांनी समन्वय साधून नियोजन करावे अशा पालकमंत्री यांनी सूचना दिल्या.










